मनोरुग्ण महिलेची व्यथा : पतीच्या निष्ठूरपणामुळे गेला तिचा जीव नागपूर : ती आधीच मनोरुग्ण. त्यात तिचा पतीही निष्ठूर. तो तिला घरातच डांबून ठेवायचा. तिचा औषधोपचार तर सोडा तिला दोन वेळा जेवायला मिळेल, याकडेही लक्ष देत नव्हता. ती बिचारी जसे जमेल तसे करायची अन् बंद दाराच्या आड मूक आक्रंदन करीत राहायची. पोटात अल्सर घेऊन विना औषध पाण्याने जगणाऱ्या या बिचारीच्या पोटात निष्ठूर पतीमुळे पाच-सात दिवसांपासून अन्नाचा एक दाणाही गेला नाही. दुसरा कुणी तिची विचारपूस करायला सोडा, बघायलाही येण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे ती घरातल्या घरात तडफडत राहिली अन् त्यातच तिचा जीव गेला. पोलीस लाईन टाकळी परिसरात राहणाऱ्या सुनीता अरविंद पांडे (वय ५०) या मनोरुग्ण महिलेच्या मृत्यूनंतर उघड झालेली माहिती सर्वसामान्यांच्या काळजाचे पाणी करणारी ठरते. उत्तर प्रदेशमधील ग्राम जमनिया (जि. गाजीपूर) येथील सुनीताचे २० वर्षांपुर्वी (१९९७) अरविंद पांडेसोबत लग्न झाले. तिकडच्या रीतीरिवाजामुळे काही महिन्यांचा ‘गौना’ कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुनीता नागपुरात पांडेच्या घरी नांदायला आली अन् तिला दु:खांनी घेरले. ती वारंवार आजारी पडू लागली. त्यानंतर ती मनोरुग्ण बनली. या स्थितीत ती घराबाहेर निघून जात असल्याने हवलदार पांडेने तिच्यावर औषधोपचाराऐवजी भलताच उपाय केला. तो तिला घरात डांबून ठेवू लागला. गेल्या वर्षी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा हा निष्ठूरपणा उघड केला. त्यानंतरही त्याने तिला रुग्णालयात पाठविण्याऐवजी घरातच डांबून ठेवणे सुरू केले. हे करताना तो पाच-पाच दिवस घराकडे फिरकत नव्हता. आठवड्यातून एखादवेळा यायचा. बाकी दुसरीकडे खायचा अन् दुसरीकडेच राहायचा. गेल्या आठवड्यातही असेच झाले. पांडे तिला घरात डांबून निघून गेला. घरात खायला अन्न नव्हते आणि दाराला बाहेरून कुलूप लावून असल्यामुळे घराबाहेर जाऊन दुसऱ्या कुणाला मागायची सोय नव्हती. त्यामुळे सुनीता बिचारी बंद दाराच्या आड आपल्या वेदना पोटात गिळून मूक आक्रंदन करू लागली. अन्नाचा दाणा पोटात नसताना तिच्या पोटातील अल्सर फुटला अन् असहाय सुनीता तडफडतच मेली. तिचा मृतदेह कुजला. दुर्गंध सुटला. गुरुवारी पांडे घरी पोहचला. जिवंतपणी पत्नीची दखल न घेणाऱ्या पांडेने मृत्यूनंतरही पत्नीला तसेच ठेवले. दुर्गंध सुटलेल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ बराच वेळ तो बसून राहिला. दरम्यान, पांडेच्या घरातून असह्य दुर्गंधी येत असल्यामुळे गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास शेजारी राहणारे पोलीस उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी गिट्टीखदान ठाण्यात माहिती कळविली. त्यावरून गिट्टीखदानचे पांडेच्या घरी पोहोचले. तेथे सुनीता पांडे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. हवालदार पांडे (मृत सुनीताचे पती) यावेळी तेथे उभा होता. पोलिसांनी मृतदेह मेयोत रवाना केला. पत्नीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत घरात पडून असताना पांडेने पोलिसांना का कळविले नाही, हा मुद्दा संशयास्पद होता. त्याची चौकशी सुरू अतानाच सुनीताचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी पोलिसांना प्राथमिक वैद्यकीय अहवाल देताना ‘सुनीता अनेक दिवसांपासून उपाशी होती अन् तिच्या पोटात अल्सर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला’, असे नमूद केले. (प्रतिनिधी)
अन्नावाचून तडफडत सोडला प्राण
By admin | Published: February 18, 2017 2:28 AM