नागपूर : सुरक्षा रक्षकाच्या मुलाला दहावीत ९७ तर पॉलिटेक्निकमध्ये ९६ टक्के गुण घेऊनही आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अंधारात आहे. त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समाजाने पुढे येऊन प्रणयच्या पंखाला बळ द्यावे, अशी अपेक्षा आहे.पैशाशिवाय शिक्षण नाही, अशी अवस्था आज शिक्षणाची झाली आहे. त्यामुळे गरिबांच्या मुलांची हुशार असूनही फरफट होत आहे. प्रणय राऊत या विद्यार्थ्याच्या शिक्षणात सुद्धा त्याची आर्थिक परिस्थिती आड आली आहे. इंजिनीअरिंगचे स्वप्न बाळगणारा प्रणय पैशाअभावी हतबल झाला आहे. प्रणयचे वडील राजेंद्र राऊत हे एका खासगी सुरक्षा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सहा हजार रुपये वेतनात पत्नी, दोन मुले असा त्यांचा संसार जुना हुडकेश्वर सौभाग्यनगर येथील एका भाड्याच्या घरात सुरू आहे. मुले हुशार असल्याने आपलीही परिस्थिती बदलेल, अशी वडिलांना आशा आहे. प्रणयने आपल्या हुशारीची चुणूकही दाखविली आहे. खडतर परिस्थितीवर मात करून प्रणयने दहावीत ९७ टक्के गुण घेतले. पुढे इंजिनीअरिंगसाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये त्याने प्रवेश घेतला. मेकॅनिकल ब्रँचमध्ये ९६ टक्के गुण त्याने मिळविले. विशेष म्हणजे एवढे गुण मिळवूनही त्याने कुठलीही खासगी शिकवणी लावली नाही. पुण्यातील शासकीय इंजिनीअरिंग महाविद्यालयात त्याला पुढचे शिक्षण करायचे आहे. येथे त्याचा नंबरही लागेल असा विश्वासही आहे. आजवर वडिलांनी जमेल ते सर्व प्रयत्न केले. मात्र, आता पुण्याचा खर्च परवडणारा नाही. पुण्यातील शासकीय महाविद्यालयाचा वर्षभराचा खर्च एक लाख रुपयांच्या घरात आहे. आधीच परिस्थितीमुळे खचलेल्या वडिलांची मुलाच्या शिक्षणासाठी वणवण सुरू आहे.
प्रणयला व्हायचे इंजिनिअर ; तुम्ही मदत कराल ?
By admin | Published: June 23, 2016 2:12 AM