लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेतील सदस्यांच्या वर्तणुकीवरून यंदा उपसभापतींनी वारंवार चिंता व्यक्त केली. परंतु, बुधवारी सदस्यांच्या भाषेचा स्तर आणखी खाली गेल्याचे दिसून आले. राज्याबाहेर उद्योग गेल्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले अन् सत्ताधारी बाकांवरील प्रसाद लाड, प्रवीण दटके व विरोधी बाकांवरील अभिजित वंजारी यांनी अक्षरश: अरेरावीची भाषा वापरली. या शाब्दिक वादात ‘अबे हट’ अन् ‘तुझ्यासारखे खूप पाहिले’ अशा आशयाचे शब्द इतर सदस्यांना ऐकावे लागले.
उपसभापतींच्या मध्यस्थीनंतर सदस्य शांत झाले. नियम ९३ अन्वये वंजारी यांनी राज्यातून बाहेरील राज्यात गेलेल्या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला. यावर उद्योगमंत्र्यांनी लेखी निवेदन दिले. त्यावर उपप्रश्न विचारत असताना वंजारी यांनी गुजरातमध्ये भाजपला जिंकविण्यात राज्य शासनाचा मोठा हातभार होता व येथील प्रकल्प तिकडे गेल्यामुळेच त्यांच्या पक्षाला फायदा झाला असे वक्तव्य केले.
‘हट...हट’ वरून झाली सुरुवात
प्रसाद लाड व प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला, तर वंजारीदेखील आक्रमक झाले. लाड यांनी हातवारे करत ‘हट हट’ असे म्हणण्यास सुरुवात केली. यावरून वंजारी यांनीदेखील ‘अरे हट’, ‘अरे चल’, अन् ‘तुझ्यासारखे खूप पाहिले’ अशा भाषेचा उपयोग केला. वाद वाढत असल्याचे दिसताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना खाली बसण्याचे निर्देश दिले.
सभागृहात मारामारी करत आहात का?
- उपसभापतींनी या मुद्द्यावरून लाड व वंजारी यांचे कान टोचले. लाड, तुमची बोलण्याची पद्धत योग्य नाही.
- तसेच वंजारी, तुम्ही सूचनेच्या ‘स्कोप’मध्ये बोला. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. अशी भाषा वापरून सभागृहात मारामारी करत आहात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
- विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना मुख्यमंत्री हेदेखील सभागृहात उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"