नागपूर : कुख्यात गुंड शेखूच्या सुटकेच्या निमित्त त्याचे स्वागत करायला आलेल्या त्याच्या समर्थकांना बुधवारी पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागला. नागपूर मध्यवर्ती कारागृह समोरच हा प्रकार घडला. काही दिवसा अगोदरच कारागृहात इप्पा टोळी आणि अंकित पाली टोळी यांच्यात राडा झाला होता हे विशेष.
शेखूला चंद्रपूरचा दारू विक्रेता बंडू आंबेटकर कडून खंडणी वसुली व अपहरणाच्या गुन्ह्यात २०१९ साली अटक करण्यात आली होती. शेखू आणि त्याच्या पत्नीसह सात जणांना आरोपी करण्यात आले. तेव्हापासून शेखू व त्याचे साथीदार तुरुंगात होते. पत्नी व इतर दोन साथीदारांना जामीन मिळाला होता. तर या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याने शेखू व त्याचे तीन सहकारी कारागृहातून बाहेर पडणार होते. त्याचे इतर सहकारी मोठ्या प्रमाणात कारागृह समोर त्याच्या स्वागतासाठी जमले होते.
मात्र सीताबर्डी येथे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शेखू विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. सीताबर्डी पोलिस ही त्याला अटक करण्यासाठी कारागृहात आले. कारागृह समोर शेखू समर्थकांचा जमाव पाहून पोलिसांनी अतिरिक्त फौज फाटा मागवला. त्यानंतर शेखूच्या समर्थकांना तेथून हाकलण्यात आले. सीताबर्डी पोलिसांनी शेखूला ताब्यात घेतले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.