नागपूर : मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांनी गुरुवारी महावितरणच्या पुनर्रचित नागपूर परिमंडळाचा कार्यभार स्वीकारला. विशेष म्हणजे, पूर्वीच्या नागपूर शहर परिमंडळाला वर्धा मंडळ जोडून नागपूर परिमंडळाची नव्याने रचना करण्यात आली आहे. शिवाय चंद्रपूर व गोंदिया या नवीन दोन परिमंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. महावितरणच्या या नव्या रचनेनुसार नागपूर व वर्धा जिल्ह्यांसाठी नागपूर परिमंडळ व गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी चंद्रपूर परिमंडळ तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यासाठी गोंदिया परिमंडळाची रचना करण्यात आली आहे. प्रसाद रेशमे हे १९९४ मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन करू न १९९७ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. यानंतर त्यांनी साकोली येथे सहायक अभियंता व भंडारा येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम केले. यानंतर २०११ मध्ये त्यांनी नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून जबाबदारी स्वीकारली. तसेच जळगाव येथे मुख्य अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले. मागील मार्च २०१५ ते सप्टेंबर २०१५ दरम्यान ते नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. शिवाय आता १ आॅक्टोबरपासून त्यांनी पुनर्रचित नागपूर परिमंडळाचा कार्यभार हाती घेतला आहे. दरम्यान नागपूर शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता मोहन झोडे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना निरोपही देण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता (पायाभूत विकास) आर.एम. बुंदिले, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, सहायक महाव्यवस्थापक सत्यजित राजेशिर्के, कार्यकारी अभियंता प्रशांत सराफ, सुनील साळवे, महेंद्र ढोबळे, श्वेता जानोरकर व स्वप्नील गोतमारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रसाद रेशमे महावितरणच्या मुख्य अभियंतापदी रुजू
By admin | Published: October 03, 2015 3:13 AM