योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी परत एकदा लावून धरली. लोकसंख्येचे असंतुलन थांबविले नाही तर अयोध्येत तयार होत असलेल्या राममंदिरालाच धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. नागपुरात रविवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
अयोध्येत राममंदिर निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र केंद्र सरकारने लोकसंख्येच्या असंतुलनाकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. ज्या प्रमाणात लोकसंख्येचे धर्माच्या आधारावर असंतुलन होत आहे, ती बाब भविष्यात धोकादायक ठरू शकते. केंद्र सरकारचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपेल, त्याअगोदरच हा कायदा लागू व्हायला हवा, असे डॉ.तोगडिया म्हणाले. अयोध्येतील मंदिर बनत असताना आता काशी, मथुरा मंदिर निर्माण होण्यासाठी कायदा व्हायला हवा. तसेच लव्ह जिहादची समस्या वाढत असून लव्ह जिहादविरोधी कायदासुद्धा तयार व्हावा, असेदेखील ते म्हणाले.
आता तरी बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल यांना भारतरत्न द्या
केंद्र शासनाने अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश देणारे उत्तरप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषणने सन्मानित केले. मात्र कारसेवकांचे नेतृत्व करणारे अशोकजी सिंघल, बाळासाहेब ठाकरे, गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्येतील रामचंद्र परमहंस, कोठारी बंधू या सर्वांना कुठलाही सन्मान मिळालेला नाही. या सर्वांना भारताने केंद्र सरकाने भारत रत्न देऊन सन्मानित करायला हवे, अशी मागणी डॉ. तोगडिया यांनी केली. ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत त्या देशाचे कधीच कल्याण होत नसते, असेदेखील ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"