नागपूर : मनेसप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. सध्या, राज्यात भोंग्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असून राज्यातील मंत्र्यांसह इतर राजकीय नेतेमंडळीही मशिदींवरील भोंग्याबाबतच विधानं करत आहेत. भोंग्यांवरून महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं असताना राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन आणि विरोध पाहायला मिळत आहे. राज्यातील भाजपने याचं समर्थन केलं आहे. त्यावरुन, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या प्रविण तोगडियांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
भाजपने भोंगे उतरविण्याचं समर्थन केलं आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण, भोंगे प्रकरणावर दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा आधी भाजपचं सरकार असलेल्या राज्यांतील मशिदीवरील भोंगे उतरवा, असे आवाहन प्रवीण तोगडीया यांनी आज नागपूर येथे केले. महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच; परंतु तेव्हा ते काढण्यात आले नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
देशात रात्री १० ते सूर्योदयापर्यत भोंगे वाजवण्यात येऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांमधील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे”. उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही १० वर्षांपूर्वीच केली होती, याची आठवणही त्यांनी करुन दिली. “ई-श्रमकार्ड’धारकांच्या बँक खात्यात दरमहा सहा हजार रूपये जमा करावेत. सर्व राज्ये तसेच केंद्र सरकार मिळून देशात रिक्त असलेल्या एक कोटी जागा त्वरित भरण्यात याव्या, आदी मागण्याही तोगडीया यांनी यावेळी केल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रवीण तोगडिया यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. मात्र, मध्यंतरी त्यांचा संघटनेतील काही नेत्यांशी वाद झाला आणि ते व्हिएचपीतून बाहेर पडले. त्यानंतर, तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली. दरम्यानच्या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अनेकदा टिकाही केली आहे. त्यातच, आता भोंग्यांच्या मुद्द्यावरुन भाजपला सवाल केले आहेत.