लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणत्याही मंदिरात देवदर्शनाला गेले की आपसूकच हात देवासमोर लागलेल्या घंटेकडे जातात. मंदिराच्या या घंटेने मनात भक्तीचे तरंग उत्पन्न होतात, ही त्यामागची भावना. मात्र कोरोना काळात कुठल्याही गोष्टीला एकापेक्षा जास्त लोकांचे स्पर्श हे धोक्याचे कारण ठरू शकते आणि देवालयातील ही घंटा अशीच अनेकांचे स्पर्श होणारी वस्तू आहे. पण मंदिरात दर्शनाला गेल्यावर तुम्ही स्पर्श न करता ही घंटा वाजली तर? होय, भक्तीचे स्वर निनादणारी ही घंटा आपोआप वाजेल पण ती चमत्काराने नाही तर तंत्रज्ञानाने. ही अभिनव संकल्पना सत्यात आणली आहे प्रा. निखिल मानकर यांनी.
प्रा. निखिल मानकर हे पाटणसावंगी, ता. सावनेरच्या आनंदराव पाटील-केदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या एमसीव्हीसी शाखेचे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नालॉजी विषयाचे प्राध्यापक आहेत. प्रा. मानकर यांनी यापूवीर्ही अत्यल्प खर्चात घरगुती साहित्याचा उपयोग करून शाळेत सेन्सरद्वारे सॅनिटायझर घेण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. यावेळीही त्यांच्या कल्पनेतून विनास्पर्श घंटा वाजण्याची अभिनव संकल्पना साकारली आहे.
त्यांच्या मते, ही इन्फ्रारेड रिमोट कन्ट्रोल सर्किटच्या नियमानुसार चालणारी संकल्पना आहे व एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल आहे. निव्वळ हाताच्या, डोक्याच्या किंवा पुस्तकाच्या सेन्सरद्वारे ही घंटा वाजू शकते. रिमोट कन्ट्रोलमध्ये रिमोट ट्रान्समीटर व आपला टीव्ही रिसिव्हर असतो. यामध्ये मात्र सेन्सर मशीन हीच ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असेल. हात दाखविला की त्या मशीनचे सेन्सर परावर्तित (रिफ्लेक्ट) होतात व परत मशीनकडे जातात. यानंतर सेन्सरमध्ये लावलेल्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्विचरद्वारे हे रिफ्लेक्शन मोटरपर्यंत जाईल. या मोटरला दोरा बांधलेला असेल जो दुसरीकडे घंटेला बांधलेला असेल. मोटर फिरली की दोरा ताणला जाईल आणि घंटा आपोआप वाजेल. यामध्ये हात दाखविण्याचीही गरज पडणार नाही.
नुसते देवाला वाकून नमस्कार केला तरी डोक्याच्या सेन्सरने किंवा पुस्तकाच्या सेन्सरनेही घंटा वाजते, असा दावा प्रा. मानकर यांनी केला आहे. प्रा. मानकर यांनी स्वत:च्या घरातील मंदिरात हा प्रयोग यशस्वी केला आहे. मात्र मंदिरातही तो सहज करता येईल. घंटा मोठी असल्यास अधिक पॉवरची मोटर वापरून हे करता येईल. इन्फ्रारेड रिमोट सेन्सिंगचा प्रयोग नवीन नाही पण त्या संकल्पनेतून मंदिरातील घंटा वाजविण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असेल आणि यासाठी प्रा. निखिल मानकर यांच्या कल्पकतेला सलाम करावाच लागेल.सध्यातरी शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र जेव्हा कधी मंदिर उघडतील तेव्हा अशाप्रकारे तंत्रज्ञान वापरले तर एखाद्या कोरोना रुग्णामुळे इतरांना होणारा संसर्ग टाळता येऊ शकेल.
- प्रा. निखिल मानकर