नागपूर : मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा आरोप असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी फेटाळून लावण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.
शेजवळ सध्या अहमदनगर येथे कार्यरत आहेत. ५ मे २०२२ रोजी सकाळी ६:४५ च्या सुमारास सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची एक गोळी गायकवाड यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जाऊन फसली होती. सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खाली पडल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा त्यावेळी गायकवाड यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये ती गोळी शेजवळ यांनी झाडल्याचे स्पष्ट झाले, असे सरकारचे म्हणणे आहे. बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये गायकवाड यांचे घर आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली होती. बजाजनगर पोलिसांनी शेजवळ यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.