नागपूर : लाखो रुपयांच्या भूखंड नियमितीकरण घोटाळ्यात आरोपी असलेल्या काटोल नगर परिषदेच्या अध्यक्ष वैशाली ठाकूर, तत्कालीन मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्यासह एकूण २० आरोपींना सत्र न्यायालयाने गुरुवारी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्या. एम. एस. आझमी यांनी हा निर्णय दिला.
१४ डिसेंबर २०२० रोजी काटोल पोलिसांनी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९, १६६, १६७, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. आरोपींनी संगनमत करून २००२ ते २०२० या कालावधीत दोन ले-आऊटमधील ७३ अवैध भूखंडांचे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमितीकरण करून लाखो रुपये मिळविले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची व कायद्यांची पायमल्ली करून हा घोटाळा करण्यात आला, असा आरोप आहे. आरोपींच्या वतीने ॲड. कमल सतुजा व ॲड. कैलाश दोडानी यांनी कामकाज पाहिले.
--------------------
असे आहेत इतर आरोपी
इतर आरोपींमध्ये सुभाष कोठे, चरणसिंग ठाकूर, जितेंद्र ठाकूर, किशोर गाढवे, राजू चरडे, माया शेरकर, शालिनी बनसोड, लता कडू, मनोज पेंदाम, प्रसन्न श्रीपटवार, संगीता हरजाळ, सुकुमार घोडे, वनिता रेवतकर, देवीदास कठाणे, शालिनी महाजन, जयश्री भुरसे, हेमराज रेवतकर व तानाजी थोटे यांचा समावेश आहे.