लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात न शिरता अथवा राेडवर तुंबून न राहता व्यवस्थित वाहून जावे तसेच तुंबून राहणाऱ्या पाण्यामुळे मालमत्तेची हानी हाेऊ नये म्हणून नगर परिषद प्रशासनाने कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात मान्सूनपूर्व साफसफाई अभियानाला शुक्रवार (दि. २८)पासून सुरुवात करण्यात आली आहे. यात शहरातील विविध भागातील सांडपाण्याच्या नाल्यांची साफसफाई केली जात आहे.
शहरातील वाढत्या काेराेना संक्रमणामुळे स्थानिक प्रशासनावरील कामाचा ताण वाढला हाेता. त्यातच पावसाळा ताेंडावर आला असून, नागरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास हाेऊ नये म्हणून स्थानिक पालिका प्रशासनाने शहरातील विविध भागामधील सांडपाण्याच्या नाल्यांची साफसफाई करणे सुरू केले आहे. पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून न केल्यास ते नागरिकांच्या घरांमध्ये शिरण्याची भीती असते. त्यातच पावसाळ्यात साथीचे व कीटकजन्य आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे ही कामे हाती घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष स्मृती इखार यांनी दिली.
शहरातील एमआययडीसी रेल्वे फाटकापासून ते गजानन नगर, तळ्याची पाळ, देशमुख ले-आऊट, झुनकी रोड, नागपूर मार्ग, गोवरी रोड पर्यंतच्या राेडलगतच्या मुख्य नाल्याची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. नाल्यांमधील गाळ व कचरा काढून त्याची वेळीच याेग्य विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही सर्व कामे पाेकलेन मशीनद्वारे केली जात आहेत.
...
गरजांच्या पूर्ततेकडे लक्ष
काेराेना संक्रमण काळात पालिकेचे सर्व विभाग शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करीत आहेत. नागरिकांच्या नैमित्तिक कामे पूर्ण करणे व गरजांची पूर्तता करणे याकडे लक्ष दिले जाईल, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली. शहरातील नागरिकांच्या आराेग्याच्या दृष्टीने साफसफाईची कामे अत्यावश्यक असल्याची माहिती नगराध्यक्ष स्मृती इखार यांनी दिली. या कार्यात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.