लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने जवानांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच वर्धा स्थित धाम प्रकल्प, महाकाली धरण येथे पार पडली.प्रतिसाद दलाचे नियंत्रण अधिकारी जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक अंतराचे पालन करून हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. यामध्ये जिल्हा शोध व बचाव पथक कर्मचारी, अशासकीय संस्था सदस्य, स्वयंसेवक, स्वयंसेविका आदींचा सहभाग होता. प्रतिसाद दल, नागपूरचे पोलीस निरीक्षक ललित मिश्रा, उपनिरीक्षक राधेलाल मडावी यांच्या नेतृत्वात प्रतिसाद दलाचे शोध व बचाव कर्मचारी प्रफुल्ल ठाकरे, सुरज बोदलकर, दर्शन चकोले, संदीप गोमटे, विनय तिवारी, तुषार देशपांडे, आशिषकुमार तिवारी, प्रफुल्ल जाधव, रोहिदास पाटील यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना पूरपरिस्थितीत बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकातून दिले. स्वत:चा जीव वाचवून इतरांचा जीव कसा वाचवावा, यासाठी बचाव साहित्य स्थानिक पातळीवर कसे उपलब्ध करावे, आपत्ती निवारणामध्ये स्वयंसेवकांची भूमिका, जबाबदारी, कोणत्याही परिस्थितीत न घाबरता सुखरूप बाहेर कसे पडावे, अशा विविध गोष्टींचे मार्गदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के व पोलीस निरीक्षक ललित मिश्रा यांनी दिले.
मान्सूनपूर्व तयारी : नागपुरात आपत्ती कृती दल सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 9:05 PM