लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडवली. मंगळवारी दुपारी शहरात बहुतेक सर्व भागांत पाऊण तास पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले तर दक्षिण-पश्चिम नागपूरसह विविध भागांत रस्त्यांवर झाडे पडली. यामुळे वीजपुरवठादेखील खंडित होता. अद्याप मान्सूनचे आगमन व्हायचेच असताना मनपाच्या पावसाळ्याच्या तयारीचे या पावसामुळे पूर्णपणे वाभाडे निघाले.
सकाळपासून आभाळात ढग दाटून आले होते. दुपारी दोनच्या सुमारास अचानक पावसाला सुुरुवात झाली. सोबतच वारेदेखील वाहत होते. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही घरांमधील शेडचे पत्रेदेखील उडून गेले तर अनेक ठिकाणी पाणी साचले. शहराच्या काही भागांत झाडांच्या फांद्या तर काही ठिकाणी झाडे कोसळली. प्रामुख्याने माटे चौक, आयटी पार्क परिसर, बजाजनगर, दीक्षाभूमी मार्ग, स्वावलंबी नगर, दीनदयाल नगर यांचा समावेश होता. झाडे पडल्यामुळे वीजपुरवठादेखील विस्कळीत झाला होता.
वाहतुकीची कोंडी
दक्षिण-पश्चिम नागपुरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पडोळे चौकाकडून स्वावलंबीनगरकडे जाणारा मार्ग पूर्णत: बंद झाला होता. तर माटे चौकात झाडे पडल्यामुळे एकाच बाजूचा रस्ता सुरू होता.
पालिकेच्या तयारीचे निघाले वाभाडे
पहिल्याच पावसाने महापालिका प्रशासनाच्या कामांचे वाभाडे काढले. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी संपूर्ण शहरामध्ये पावसाळापूर्व कामे केली जातात. यामध्ये नाले, ड्रेनेज सफाई, रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधील गाळ, कचरा काढणे, रस्ते, फुटपाथ दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे केली जातात. मात्र ज्या प्रकारे काही ठिकाणी पाणी साचले ते पाहता मनपाच्या तयारीवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रामदासपेठ, काचीपुरा मार्ग, सीताबर्डी येथील मुख्य रस्त्यांना तर तळ्याचे स्वरूप आले होते.