लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात आयोजित करण्याचे पूर्वीच जाहीर झालेले आहे. अधिवेशनासाठी केवळ महिना शिल्लक आहे. परंतु त्यादृष्टीने नागपुरात अद्याप कुठलीही तयारी दिसून येत नाही. साध्या इमारतीच्या रंगरंगोटीची कामेही अद्याप सुरू झालेले नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तयारीच्या दृष्टीने करावयाच्या कामांचे अद्याप वर्कऑर्डरच निघालेल्या नाहीत. त्यामुळे नागपुरात अधिवेशन होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
७ डिसेंबरपासून अधिवेशन होणार असल्याची घोषणा झालेली आहे. त्यानुसार २५ नोव्हेंबरपर्यंत अधिवेशनाच्या कामाशी संबंधित इमारती या विधिमंडळ सचिवालयाकडे सोपवायच्या आहेत. अधिवेशनाच्या तयारीसाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कुठल्याही कामाचे वर्कऑर्डर काढलेले नाही. विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीची प्रतीक्षा केली जात आहे. त्या बैठकीत काय निर्णय होईल, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.
समितीची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बुधवारी होऊ शकते. हिवाळी अधिवेशन हे परंपरेनुसार नागपुरात होणार, की कोविड संक्रमण वाढण्याची भीती लक्षात घेता मुंबईत घ्यायचे याबाबतचा अंतिम निर्णय समितीला घ्यायचा आहे. नागपुरात अधिवेशन घेण्याचा निर्णय झालाच तर दोन महिन्यात होणारी कामे १५ ते २० दिवसात पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राहील.
रवि भवनातील एसी बंद, रंगरंगोटीही नाही
रवि भवनात मंत्र्यांचे निवासस्थान आहे. सध्या येथील २४ पेक्षा अधिक एसी बंद असल्याची माहिती आहे. अनेक कॉटेजची स्थिती चांगली नाही. रंगरंगोटीची अत्यंत आवश्यकता आहे. गडरलाइनही खराब झालेली आहे. नवीन पाइपलाइन टाकावी लागू शकते. रंगरंगोटीनंतर फर्निचर व इतर कामेही करावयाची आहेत.
हैदराबाद हाउसमधून कार्यालय शिफ्ट करण्यास अडचण
हैदराबाद हाउस २५ नोव्हेंबर रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे सोपवायचे आहे. येथेही रंगरंगोटीची गरज आहे. साफ-सफाईहीसुद्धा करायची आहे. प्लम्बिंगच्या कामासह शौचालयांची दुरुस्ती करायची आहे. येथे एसीबी व मनरेगा कार्यालये आहेत. इतक्या कमी वेळेत ही कार्यालये शिफ्ट करणे सर्वात मोठी अडचण आहे.
विधानभवनाच्या नव्या इमारतीत फर्निचरच नाही
विधानभवनात मंत्र्यांच्या केबिनसाठी नवीन इमारत बनवण्यात आली आहे. परंतु या इमारतीचा मंजूर नकाशा अजूनही पीडब्ल्यूडीच्या हाती आलेला नाही. या तांत्रिक अडचणीसह या इमारतीत अजूनपर्यंत फर्निचरसुद्धा लागलेले नाही. कॅन्टीनचे कामही अपूर्ण आहे. ही कामे पूर्ण करायला किमान २० दिवस लागू शकतात.
आमदार निवासातही अडचणी
आमदार निवासाच्या पहिल्या विंगचे काम अजूनही शेवटच्या टप्प्यात आहे. इतर विंगमध्ये कोविड केअर सेंटर उघडण्यात आले होते. सध्या कोविड सेंटर हटवून इमारती बंद ठेवण्यात आल्या आहेत. या इमारतीला सॅनिटाइज करून रंगरंगोटी करणे अतिशय आवश्यक आहे. हे काम लवकर पूर्ण होईल, याची शक्यता कमीच आहे.