परिवहन आयुक्त वर्धने यांनी केली जागेची पाहणी : फेब्रुवारीत निविदा प्रक्रियानागपूर : श्याम वर्धने यांच्याकडे परिवहन आयुक्तपदाची जबाबदारी येताच त्यांनी पहिली भेट नागपूरला दिली. शनिवारी पूर्व नागपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करीत आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया तर मार्च महिन्यात बांधकामाचे भूमिपूजन करा, असे निर्देशही दिलेत. यावेळी आ. कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते.डिप्टी सिग्नल चिखली देवस्थान येथील नासुप्रची चार एकरची जागा पूर्व आरटीओला मिळण्यासाठी बऱ्याच प्रयत्नानंतर यश आले. चार कोटी एक लाख रुपये किमत असलेल्या या जागेचे आतापर्यंत परिवहन विभागाने २ कोटी ७० लाख भरले आहेत. उर्वरित १ कोटी ३१ लाख रुपये लवकरच भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आ. कृष्णा खोपडे यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेवर कार्यालयीन इमारतीच्या बांधकामासाठी ३० कोटींच्या प्रस्ताव्यास मान्यता दिली आहे. वर्धने यांच्याकडे परिवहन आयुक्त पदाची सूत्रे येताच त्यांनी या जागेची पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी वर्धने यांनी नागपूर सुधार प्रन्यासने प्रस्तावित केलेल्या तळघरासह दोन मजल्याच्या या इमारतीच्या कागदपत्रांची पाहणी केली. त्यांनी हे कार्यालय संपूर्ण राज्यातच नव्हे तर मध्य भारतात ‘मॉडेल’ व्हावे अशी इच्छाही व्यक्त केली. कार्यालयाच्या बांधकामाचे क्षेत्रफळ ५७७२.३९ चौ. मी. इतके राहणार आहे. यात कार्यालयात येणाऱ्यांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात. कार्यालयात गर्दी होणार नाही तसेच स्वच्छता गृहाची विशेष सोय करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. आ. खोपडे यांनी निधी उपलब्ध होण्यास अडचण जाणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर डॉ. दुर्गप्पा पवार, आर्किटेक्चर स्वप्निल वरंभे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पूर्व नागपूर रवींद्र भुयार आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)असे असणार पूर्व आरटीओआर्किटेक्ट वरंभे यांनी सांगितले, तळघरासह दोन मजल्यांची ही इमारत असणार आहे. लोकांना एकाच ठिकाणी सोयीसुविधा मिळेल, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर एकाच वेळी ३०० वर लोक आपली कामे करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. येथेच ‘ट्रान्सपोर्ट’, ‘लायसन्स’ व ‘परमिट’ देण्याचे काम होईल. पाणी, स्वच्छता गृह आणि कॅन्टीनची व्यवस्थाही असणार आहे. पहिल्या मजल्यावर आरटीओ, उपआरटीओ व इतर अधिकाऱ्यांच्या कक्षासह उर्वरित सर्व विभागाचे कामकाज चालेल. या शिवाय भांडार विभाग आणि छोटे सभागृहही राहील. दुसऱ्या मजल्यावर २५० लोक एकाचवेळी बसू शकतील, असे सभागृह असणार आहे. सोबतच ‘गेस्ट हाऊस’ची सोयही असणार आहे. या संपूर्ण इमारतीत कमीतकमी विजेचा वापर होईल आणि अपंगाना सोयीचे जाईल असे ‘डिझाईन’ करण्यात आले आहे.
पूर्व आरटीओ कार्यालयाचे भूमिपूजन मार्चमध्ये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 3:12 AM