नागपूर : देशभरात कडाक्याच्या थंडीने कहर केला असताना आता उपराजधानीतही शीतलहरीने शिरकाव केला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे शहरात चांगलाच गारठा निर्माण झाला होता. यामुळे गुरुवारी नागपुरातील किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. सायंकाळ होताच अचानक थंड वारे वाहू लागले. यामुळे संपूर्ण नागपूर गारठल्यासारखे दिसत होते. या शीतलहरीपासून बचावासाठी अनेकांनी गरम कपडे व शेकोटीचा आधार घेतला होता. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातसुद्धा नागपुरातील किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. परंतु काहीच दिवसांत पुन्हा तापमान चढल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. गुरुवारी उपराजधानीसोबतच विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमानात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यात अकोला येथील किमान तापमान सर्वांधिक म्हणजे, १०.९ अंशापर्यंत खाली आले आहे. हवामान तज्ज्ञ ए. व्ही. गोडे यांच्या मते, सध्या विदर्भात उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे येत आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन, थंडीचा जोर वाढला आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)
उपराजधानीत गारठा
By admin | Published: December 25, 2015 3:37 AM