मुनिश्री प्रतीकसागर महाराज : दिगंबर जैन जागरण युवा संघाच्या अधिवेशनात आवाहननागपूर : राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, गरिबांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या, साधूसंतांची सेवा करा, संस्कृती आणि नैतिकतेचे संरक्षण करा, भू्रणहत्येविरुद्ध जनजागृती, गोवंश रक्षा, अशा धार्मिक-सामाजिक कार्यात कधीही खंड पडू देऊ नका, असे आवाहन मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांनी केले. अखिल भारतीय दिगंबर जैन जागरण युवा संघाचे चौथे अधिवेशन शनिवारी रजवाडा पॅलेस येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात मुनीश्री बोलत होेते. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांनी पदाची शपथ घेतली. या अधिवेशनात मुंबई, कोपरगाव, सोलापूर, दिल्ली, इंदूर, ग्वाल्हेर, उदयपूर, फलटण, अकलूज अशा देशातील विविध शहरांमधून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशन सुरू होण्याआधी सकाळी खंडेलवाल भवन, भाजीमंडी इतवारी येथून निघालेली शोभायात्रा नंतर कार्यक्रमस्थळी पोहोचली. सुनील पेंढारी व नीता पेंढारी यांच्या हस्ते मंचचे उद्घाटन झाले. यावेळी बालिकांनी मंगलाचरण नृत्य सादर केले.जैन युवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील गंगवाल यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, दिगंबर जैन महासभेचे विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष सुरेश आग्रेकर, महासमितीच्या महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. रिचा जैन, सुरेश जैन, कन्हैयालाल ढालावत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा, वर्धमान अर्बन को-आॅप. बँकेचे संचालक अतुल कोटेचा उपस्थित होते. यावेळी अभयकुमार पनवेलकर, सुमत लल्ला, संजय टक्कामोरे, अरविंद जैन, त्रिलोकचंद जैन, हीराचंद मिश्रिकोटकर उपस्थित होते. कार्र्यक्रमाचे संचालन महेश तिवारी तर आभार नागपूर शाखेचे अध्यक्ष मनोज जैन यांनी मानले. केवळ नावाने नव्हे, कर्माने जैन बनासकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मला जैन समाजाच्या एकतेवर विश्वास आहे. एक काळ असा होता जेव्हा देशाच्या संसदेत जैन धर्माच्या खासदारांची संख्या ५५ होती. आता मोजकेच खासदार उरले आहेत. मी याआधी चार वेळा जैन संतांच्या चातुर्मासाचे संयोजन केले आहे. १९९४ साली प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या चातुर्मासात सर्व धर्माचे संत एका मंचावर आले होते. आज आमची स्थिती मोकळ्या मुठीसारखी आहे. परिणामी आमचा आवाज बुलंद होत नाही. हे चित्र बदलायचे असेल दिगंबर-श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी असा भेद सोडून एकत्र यावे लागेल. तेव्हाच आम्ही समाजासमोर आमचे विचार सशक्तपणे मांडू शकू. पण, यासाठी आधी आम्हाला खऱ्या अर्थाने जैन बनावे लागेल, आपल्या धर्माप्रति जागरुक व्हावे लागेल. केवळ नावाने जैन होऊन उपयोग नाही आम्हाला कर्मानेही जैन व्हावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
राष्ट्रहिताला प्राधान्य द्या
By admin | Published: October 02, 2016 2:49 AM