उमरेड : आधी किडींचा हल्लाबोल. येलो मोझॅकने वाढविलेली डोकेदुखी आणि परतीच्या पावसाचा दणका यामुळे सरत्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची दाणादाण झाली. उत्पादनात कमालीची घट, दाणा बारीक आणि बहुतांश खराब उत्पादनामुळे शेतकरी बेचैन झालेत.
आधीच उत्पादन कमी झाल्याने २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकणार आहे. सोयाबीन बियाणांची पंचाईत येणार असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे सुविधा आहेत त्यांनी उन्हाळी सोयाबीनसाठी पाऊल उचलावे, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.
उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल याकडे दिसून येत असून, आतापावेतो ४०० एकर क्षेत्रात उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे उत्पादन नगण्य झाले. या कारणामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा पडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अशावेळी ज्यांच्या शेतात कपाशी आहे, शिवाय ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन केले जात आहे. रबी हंगामाच्या शेवटी अथवा उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनासाठी पेरणी करता येणे शक्य आहे. डिसेंबर शेवटचा आठवडा ते जानेवारीचा पहिला पंधरवडा यादरम्यान ही पेरणी करता येऊ शकेल. ९० दिवसांचे सोयाबीन पीक असून, गावाची गरज गावातच भागवावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्याजवळील बियाणे राखून ठेवण्याचेही आवाहन केले जात आहे.
---
शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नसेल तर खरीप हंगामातील उत्पादनाचा वापर यासाठी करता येईल. त्याच्या उगवण शक्तीची तपासणी करून बीजोत्पादनासाठी वापर करावा. उत्पादन नेहमीच्या उत्पादनापेक्षा कमी होत असले तरी बीजोत्पादनासाठी उपयोगी ठरणार आहे.
संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड