लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : आगामी काळात काेविड-१९ साथराेगावर लस येण्याची शक्यता आहे. काेविड लसीकरण माेहीम ही आतापर्यंतच्या माेहिमेमधील सर्वात माेठी माेहीम असणार आहे. यासाठी तालुका प्रशासन सज्ज असून, लसीकरणासाठी लागणारे संभाव्य मनुष्यबळ व लाॅजिस्टिक याबाबत चर्चा करण्यात आली. काेराेना महामारीत जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या ‘फ्रंटलाईन वर्कर’ना लसीकरणासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे मत तहसीलदार अरविंद हिंगे यांनी व्यक्त केले.
कामठी तहसील कार्यालयाच्या सहभागृहात तालुकास्तरीय समन्वय समिती (टास्क फाेर्स) काेविड संसर्ग नियंत्रणाबाबत बैठक पार पडली. या बैठकीला टास्क फाेर्सचे सचिव तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, मुख्याधिकारी संदीप बाेरकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भारती मानकर, गटशिक्षणाधिकारी प्रदीप नागपुरे, गुमथळा प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. माेहनीश तिवारी, गुमथी केंद्राचे डाॅ. राहुल राऊत, डॉ. हर्षल वंजारो, आरोग्य पर्यवेक्षक गोपीचंद कातुरे, नायब तहसीलदार राजेश माळी, परिविक्षाधीन तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, विस्तार अधिकारी एम. दिघाडे, आरोग्य सहायक प्रकाश भारद्वाज, आरोग्य सहायक विनोद बाराहाते आदींची उपस्थिती हाेती.
या बैठकीत आरोग्य विभाग तसेच इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी संकलित करून सदर कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीत यापूर्वी कधी कोविडची लागण झाली काय व कालावधी तसेच सदर कर्मचाऱ्यास कोणत्या प्रकारची क्रोमाबिडीटी असल्यास त्याची माहिती गोळा करून सविस्तर माहिती सात दिवसाच्या आत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे जमा करावी तसेच अशाच प्रकारची माहिती खासगी दवाखान्यात कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.