सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. कोरोनावर प्रतिबंधक लस नव्या वर्षात येण्याची शक्यता आहे. ही लस पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील १७,६४४ वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, यात खासगी हॉस्पिटलमधील ५,९८९ डॉक्टरांचा समावेश असणार आहे.
कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ व ‘कोव्हिशिल्ड’ लसीची मानवी चाचणी नागपुरात सुरू आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा राज्यातील पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा आहे. तर ‘कोव्हिशिल्ड’ चाचणीचा तिसरा टप्पा पहिल्यांदाच नागपूरच्या मेडिकलमधून सुरू झाला आहे. लसीची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. शासनाचे जानेवारी महिन्यात प्रतिबंधात्मक लसीकरणाचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण होणार आहे. त्यानुसार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत १७,६४४ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली होती.
-कोरोना परतीच्या मार्गावर
नागपूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १९२ रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण व मृत्यूची संख्या पुढे आली. परंतु कोरोनाची दुसरी लाट पाश्चात्य देशात दिसून येऊ लागल्याने खबरदारीचे उपाय घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या १,०२,९७८ तर मृतांची संख्या ३,४१० झाली आहे. ९५,६३८ रुग्ण बरे तर ३,९६० रुग्ण क्रियाशील आहेत.
-यांना मिळणार लस
शासकीय : डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, रुग्णवाहिका कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी व आशा वर्कर आदींना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.
-लस येईल तेव्हा
१ :: जानेवारी महिन्यात लस येणार असली तरी नागपुरात वाढणाऱ्या थंडीमुळे बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
२ :: सध्या सण-उत्सवामुळे सर्वत्र गर्दी होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाला आहे. यामुळे डिसेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
३ :: दुसरी लाट अधिक तीव्र येणार असल्यास डॉक्टरांसह परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लस येईपर्यंत अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश
मुंबई नर्सिंग होम अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोविड डाटाबेस प्रोग्राम अंतर्गत लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार आतापर्यंत ५,९८९ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. शासनाच्या निर्णयानुसार कोविड डाटाबेस प्रोग्राम अतंर्गत फ्रंटलाइन वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
-डॉ. देवेंद्र पातुरकर
जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर