लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी नगरसेवक दिलीप ग्वालबन्सी याच्यासारखे शेकडो भूमाफिया उपराजधानीत आहेत. काहींनी खासगी जमिनी, गृहनिर्माण संस्थांमधील इतरांचे भूखंड तर काहींनी सरकारी जमिनी हडप केल्या आहेत. खासगी जमिनी हडप करणारे चव्हाट्यावर येत आहेत, पण सरकारी जमिनी हडप करणारे गब्बर झाले आहेत. उजळ माथ्याने वावरत आहेत. हाताशी धरलेल्या सरकारी यंत्रणेला मालामाल करून हडपलेल्या सरकारी जमिनींवर काहींनी मोठमोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स, इस्पितळे तर काहींनी शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत. सरकारचे अभय असल्याने ग्वालबंन्सी टोळीचा भंडाफोड करण्यात पोलीस आणि जिल्हाप्रशासनाला यश आले. मात्र ज्यांनी आजवर गरिबांच्या कोट्यवधींच्या जमिनी बळकावल्या आहेत, अशा भूमाफियांवर पोलीस कधी कारवाई करणार असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात आजही कायम आहे. फार पूर्वी निर्वासितांचे जत्थे नागपुरात आले. त्यांच्या निवाऱ्यासाठी सरकारने उत्तर आणि पश्चिम नागपुरात शिबिरे उभारून दिली. हे निर्वासित आता मोठमोठ्या इमल्यांचे मालक आहेत. त्यांच्यापैकीच एक बडा भूमाफिया झाला आहे. या शहरातील तो पहिला आणि सर्वात मोठा भूमाफिया म्हणून नावारूपास आला. त्याने सदर छावणी, वर्धमाननगर, सीताबर्डी लेंड्रा भाग, सिव्हिल लाईन्स या ठिकाणी मोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारले. एका मराठी माणसाने जमिनी व भूखंड हडपण्याचे त्याचे कृत्य समाजापुढे आणण्यासाठी एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाने काही काळ मोठा गहजब केला होता. या भूमाफियाकडून त्याला कायमचे हटविण्याचा मोठा प्रयत्नही झाला होता. आता या मराठी माणसाचा कुठेही थांगपत्ता नाही. काही वर्षांपूर्वी हा बडा भूमाफिया एका गुंडाने केलेल्या गोळीबारातून थोडक्यात बचावला होता. या गुंडाचा पुढे खात्मा झाला. हा भूमाफिया आता अब्जाधीश असून छावणी भागात आलिशान जीवन जगत आहे. दक्षिण नागपुरातील एका संघटित टोळीचा म्होरक्या हा रेशीमबाग भागात वास्तव्यास असलेल्या एका नगरसेवकासोबत हडपलेले भूखंड विकून फसवणूक करतो. या टोळीने महत्वाच्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता बळकावल्या आहेत. उंटखाना, वर्धमाननगर, रामदासपेठ, धरमपेठ, वर्धा रोड आणि अमरावती रोड येथे या टोळीच्या मालमत्ता आहेत. टोळीचा म्होरक्या खुद्द पुढे नसतो, त्याच्या निर्देशानुसार टोळी सदस्य कार्य करतात. उमरेड रोडवरील व्यापारी आणि उद्योजकांकडून खंडण्या वसूल करणारा एक गुन्हेगार भूखंड माफिया झाला आहे. त्याच्या बहादुरा, पाचगाव भागात जमिनी आहेत. त्यापैकी बऱ्याच जमिनी त्याने हडपलेल्या आहेत. एका खुनात हायकोर्टाने जन्मठेप कायम केल्यानंतर पुन्हा एका अपहरण व खंडणीच्या प्रकरणात अडकून ‘मोक्का’च्या सापळ्यात अडकलेल्या सक्करदरा भागातील एका कुख्यात गुन्हेगाराच्या वर्धा मार्गावरील चिचभवन भागात भूखंड आहे. वादग्रस्त भूखंड तो स्वत: कमी किमतीत विकत घेतो. तोही आता भूखंड माफिया असून सध्या कारागृहात असल्याने त्याच्या टोळीच्या हालचाली ठप्प झाल्या आहेत. इतवारी रेल्वेस्थानक भागात जुगार अड्डा चालविणारा भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसायात गुंतला आहे. जुगारात हरलेले भूखंड त्याच्याकडे आहे. पारडी, कळमना, पुनापूर, शांतिनगर, कावरापेठ आणि कामठी रोडवर त्याचे भूखंड आहेत. झुडपी जंगल, कृषी आणि महसूल विभागाच्या जमिनीबाबत बनावट दस्तावेज तयार करून त्याची विक्री करणारा एक भूमाफिया पश्चिम नागपुरात सक्रिय आहे. उल्लेखनीय म्हणजे या भूमाफियाने विकलेल्या जमिनीवर मोठमोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे आहेत. दुसऱ्याच्या भूखंडाचे बनावट दस्तावेज तयार करून ते हडपणारे अजनी भागातील दोन भावंडे सध्या चर्चेत आहे. बेसा, हरिवेळा, बोखारा भागात त्यांचे भूखंड आहेत. या दोघांनी काही वर्षांपूर्वी अजनी भागातील मृत जुगारअड्डाचालकाची कोट्यवधीची जमीन हडपली होती. हा अड्डाचालक विवाहित नसतानाही त्याला विवाहित दाखवून या दोघांनी त्याच्या अनेक जमिनी हडपल्या होत्या. त्यांना पोलिसांनी अटकही केली होती. दुसऱ्याचे भूखंड हडपण्याचे भूमाफियांचे कृत्य दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. अजनी भागात बिल्डर आणि गुंडांच्या टोळीने नुकताच वैद्य दाम्पत्याचा निर्घृण खून करून त्यांचे मृतदेह बुटीबोरी भागात पुरले होते. आजवर वैद्य दाम्पत्यासारखे अनेक बळी भूखंडमाफियांनी घेतले आहेत. काहींचा खून तर काहींनी आत्महत्या केलेली आहे. खून करून अनेक मृतदेह बेवारस फेकून दिलेले आहेत . आजही त्यांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून माहीत असलेल्या भूमाफियांच्या मालमत्तांबाबत चौकशी केल्यास बऱ्याच जणांचे पितळ उघडे पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पूर्व नागपुरातील आता हयात नसलेला सट्टाकिंग ‘प्राईम लोकेशन’ मधील २०० एकरहून अधिक जमिनीचा मालक आहे. अपहरण,धमक्या, हाणामारी, खून यासारखे कृत्य करून सट्टाकिंगच्या टोळीने खासगी जमिनी बळकावल्या आहेत. कुटुंबातील बहुतांश सदस्य गुन्हेगारीत सक्रिय आहे. संघटित गुन्हेगारी टोळी संदर्भातील कायद्यान्वये सत्र न्यायालयात त्यांना शिक्षा झालेली आहे. मात्र उच्च न्यायालयातून ते निर्दोष सुटलेले आहेत. गुन्हेगारी कृत्यांवर पांघरुण म्हणून कुटुंब सदस्य कधीकधी राजकीय आश्रय घेतात. वर्धा रोड, भंडारा रोड या भागात सट्टाकिंग कुटुंबाच्या १०० एकरहून अधिक जमिनी आहेत.
उपराजधानीत भूमाफिया राज
By admin | Published: May 15, 2017 2:04 AM