नागपूर - प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा प्रियकर फरार झाला. तर, गर्भधारणेमुळेच आता या अल्पवयीन मुलीचे कसे करावे, असा प्रश्न पालकांसह पोलिसांनाही पडला आहे.
प्रकरण यशोधरानगरातील आहे. मुलगी १७ वर्षांची असून ११ वीत शिकते. तिचा प्रियकर आरोपी विक्रांत शिवाजी गाैरकर (वय २३) मुळचा भंडारा येथील रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो शांतीनगरात राहतो. त्याचे दोन वर्षांपासून या मुलीशी प्रेमसंबंध असून या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेत वारंवार शरिरसंबंध जोडल्याने तिला गर्भधारणा झाली. काही दिवसांपूर्वी पोट दुखत असल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे नेल्याने ती गर्भवती असल्याचा खुलासा झाला. त्यामुळे प्रकरण यशोधरानगर पोलिसांकडे पोहचले. पोलिसांनी आरोपी विक्रांतविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करताच तो फरार झाला.
पालकांवर तिचा दुसरा आघात
अल्पवयातच नको तो प्रकार करून गर्भवती बनलेल्या या मुलीने विक्रांतवर कारवाई केली तर आत्महत्या करेन, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे पालकांवर दुसरा आघात झाला आहे. पोलीसही संभ्रमात सापडले आहे.
गर्भपाताच्या परवानगीसाठी कायदेशिर प्रक्रिया
पोलिसांनी हे प्रकरण महिला तसेच बालकल्याण समितीकडे नेले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुलीला समजावण्याचे प्रयत्न चालविले आहे. दुसरीकडे पोलीस आणि महिला व बालकल्याण समितीने आता मुलीचा गर्भपात करण्यासाठी न्यायालयातून परवानगी मिळावी म्हणून कायदेशिर प्रक्रिया सुरू केली आहे.