नागपूर : कोरोनावर सध्या तरी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. गंभीर धोका टाळण्यासाठी लस आवश्यक असल्याने १६ जुलैपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली; परंतु गर्भवतींनी याकडे पाठ फिरविली आहे. चार दिवसांत केवळ ५७ गर्भवतींचे लसीकरण झाले. ही संख्या वाढविण्यासाठी मनपाचे आरोग्य विभाग आता स्त्रीरोग संघटनेची मदत घेणार आहेत.
गर्भवती मातांना लस द्यावी अथवा नाही याबाबत सुरुवातीला संभ्रमाची स्थिती होती. केंद्र शासनानेही आवश्यक निर्देश दिले नव्हते. मात्र, २ जुलै २०२१ रोजी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार १६ जुलै रोजी मनपाच्या पाचपावली सूतिकागृह येथे गर्भवती व स्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जवळपास ३७ हजार प्रसूती होतात. त्या दृष्टीने लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त गर्भवती व स्तनदा मातांच्या लसीकरणासाठी डागा रुग्णालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेयो) स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे; परंतु त्याचा फारसा फायदा होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
: दोन जीवांची भीती
(कोट)
-कोरोनाच्या गंभीर लक्षणांना दूर ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे; परंतु आपल्याकडे यासंदर्भातील मानवी चाचणी झाली नाही. यामुळे मनात भीती आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस घेईल.
-एक गर्भवती स्त्री
(कोट)
- कोरोना प्रतिबंधक लस अद्याप घेतलेली नाही. गर्भधारणेनंतर कोणत्या महिन्यात ही लस घ्यावी, त्याचे दुष्परिणाम आहेत का, याविषयी माहिती घेत आहे. शासनाने यासंदर्भातील माहिती टीव्ही, रेडिओवरून दिल्यास मदत होईल.
-एक गर्भवती स्त्री
-समुपदेशन केले जात आहे
गर्भवती व स्तनदा मातांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे; परंतु अल्प प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण वाढविण्यासाठी समुपदेशन केले जात आहे. सोबतच आता स्त्रीरोग संघटनेची मदत घेतली जाणार आहे. मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयातील डॉक्टरांची बैठक घेतली.
-डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी, मनपा
-लसीकरणाची स्थिती
पहिला डोस :-
१८ ते ४४ वयोगट-२७०२६५
४५ ते ५९ वयोगट- १७१६६०
६० वयोगट व त्यापुढील - १९१८८३
गरोदर माता -५७
पहिला डोस एकूण : ८२२२८३
:: दुसरा डोस
१८ ते ४४ वयोगट : १४२५८
४५ ते ५९ वयोगट : ११२९६९
६० वयोगट व त्यापुढील : ११५०११
दुसरा डोस एकूण - ३२२७१८