नागपूर : रविवारी पहाटे ५ वाजताची वेळ... प्रसूती कक्षात ती एकटीच प्रसववेदनांनी विव्हळत होती... तिच्या ओरडण्याने दुसऱ्या रुग्णाची एक महिला नातेवाईक धावत आली. तिच्या मदतीने या गर्भवतीने स्वत:ची प्रसूती केली. या गडबडीत हाताचे सलाइन निघाल्यामुळे गर्भवती रक्तबंबाळ झाली होती. ही धक्कादायक घटना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात घडला.
सुकेशनी श्रीकांत चतारे (२३, रा. दुबेनगर, हुडकेश्वर) असे या महिलेचे नाव असून, ती दोन महिन्यांची गर्भवती असल्यापासून तिच्यावर या रुणालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी ती वॉर्ड ३३मध्ये भरती झाली. सुरुवातीला तिला चक्क जमिनीवर झोपविण्यात आले होते. स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख डॉ. फिदवी यांच्याकडे तक्रार केल्यावर तिला खाट देण्यात आली.
मध्यरात्री २च्या सुमारास तिला प्रसवकळा सुरू झाल्या. डॉक्टरांनी तिला प्रसूती कक्षात नेले. मात्र प्रसूती होत नसल्याचे पाहता डॉक्टर निघून गेले. रात्री ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ती एकटीच होती. ५ वाजून १० मिनिटांनी ती प्रसूतीच्या वेदनेने ओरडायला लागली. जवळ डॉक्टर वा परिचारिका नसल्याने तिने स्वत:च प्रसूती केली. त्यानंतर एका हाताने बाळाला पकडत दुसºया थरथरत्या हाताने आईला फोन लावला. वॉर्डात असलेली आई धावत कक्षात आली. तिनेही आरडाओरड केल्याने परिचारिका आत आली. तिने नाळ कापून तिला नवजात बालकासह फरशीवर झोपविले.