नागपूर : गर्भवती महिलांनाही आता कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने याला हिरवी झेंडी दिली आहे. या निर्णयामुळे गरोदर महिलांमध्ये कोरोनाचा धोका कमी होणार आहे; परंतु लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट एकीकडे आटोक्यात येत आहे तर, तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनावर सध्यातरी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. गंभीर धोका टाळण्यासाठी लस आवश्यक आहे. दरम्यान, मासिकपाळीत, स्तनदा माता किंवा गर्भवती असाल तर लस घ्यायची की नाही? यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मासिकपाळीचा रोगप्रतिकारशक्तीशी संबंध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी मासिकपाळीच्या कुठल्याही दिवशी लस घेण्याचा सल्ला दिला होता, तर स्तनदा मातांना यापूर्वीच लस घेण्याची परवानगी देण्यात आली होती. आता गर्भवती महिलांच्या लसीकरणाला मंजुरी मिळाल्याने त्यांना कोविडशी लढणे सोपे जाणार आहे.
::गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी
-३५ वर्षांवरील मातांनी लस घेताना त्यांना असलेल्या सहव्याधींची माहिती डॉक्टरांना देऊन त्यांच्या सल्ल्याने लस घ्यावी.
- लस घेण्यापूर्वी भरपूर नाश्ता किंवा जेवण करावे
- गर्भधारणेनंतर पहिले १३ आठवडे पूर्ण झाल्यावरच लस घ्यावी
- लसीकरणानंतर कुठलीही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
-मास्क बांधणे, वारंवार हात धुणे व अंतर पाळणे आवश्यक
कोट....
-गर्भवतीसोबतच बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते
अमेरिका, यूकेसारख्या देशात गर्भवतींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते. आपल्याकडे उशिरा सुरुवात झाली असली तरी आता त्याचा वेग वाढवायला हवा. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने गर्भवतीसोबतच पोटातील बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कुठलीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. सुषमा देशमुख, स्त्रीरोग व प्रसूतीरोग तज्ज्ञ
-कोरोनाची तीव्रता कमी होईल
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत गर्भवतींना व बाळांतपणानंतर शिशूंना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाल्याचा नोंदी आहेत. यामुळे स्त्रीरोग संघटनेने गर्भवतींचे लसीकरण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. अखेर त्याला परवानगी मिळाली. लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी होते यामुळे प्रत्येक गर्भवतीने लस घेणे गरजेचे आहे.
-डॉ. अलका मुखर्जी, अध्यक्ष प्रसूती व स्त्रीरोग संघटना
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण (शहर) -८,८७,४१८
पहिला डोस -६,७२,८९३
दोन्ही डोस -२,१४,५२५