काटोल/कोंढाळी/सावरगाव/मोवाड/कामठी : रबी हंगामातील पिकाची कापणी सुरु असताना दोन दिवसापासून सुरु असलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शुक्रवारी रात्री काटोल, नरखेड, नागपूर ग्रामीण, रामटेक, सावनेर आदी तालुक्यात वादळी पाऊस झाला. काटोल तालुक्यात कोंढाळी परिसरात गारपिटीमुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. रबी पिकांची कापणी सुरू असताना वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची तांराबळ उडाली आहे. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. काटोल शहरासह तालुक्यातील डोंगरगाव, घुबडमेट, गोन्ही, चिखली, येनवा, ईसापूर, कलंभा, रिधोरा, लिंगा, हातला, ढवळापूर शिवारात दमदार पावसाने हजेरी लावली.
कोंढाळी परिसरात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मासोद, कामठी, पुसागोंदी, धुरखेडा, बोरगाव आदी शिवारात गारपिटीसह पाऊस झाला. वादळासह १५ ते २० मिनिटे गारपीट झाल्याने गहू,चणा व टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले. वादळी पावसाने नुकतीच फूट होत असलेल्या संत्र्याचा अंबिया बहारही संकटात सापडला. संत्रा झाडाच्या पानांना सुद्धा गाराचा मार बसल्याची माहिती मासोदचे माजी सरपंच प्रकाश बारंगे यांनी दिली. इकडे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरु करण्यात आल्याची माहिती कोंढाळीचे नायब तहसीलदार नीलेश कदम यांनी दिली.
नरखेड तालुक्यातील सावरगाव परिसरातही गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी आलेल्या पावसामुळे गहू,चणा, पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच वातावरणीय बदलामुळे अंबिया बहाराच्या संत्रा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक सोयाबीन, कपाशी उद्ध्वस्त झाले. कशीबशी आस रबी पिकांवर होती. परंतू ऐन कापणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्यामुळे पिकाच्या उत्पादनावर फटका बसणार आहे. मेंढला परिसरातील शुक्रवारी ४.३० वाजताच्या मेघगर्जनेसह सुमारास पाऊस झाला. त्यामुळे शेतातील गहू, हरभऱ्यांची गंजी भिजली. कामठी तालुक्यातही अजनी, गादा व नेरी शिवारात शेतमालाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
अंबिया बहारला फटका
नरखेड तालुक्यातील मोवाड येथे वादळी पावासमुळे मध्यरात्री हजेरी लावली. सध्या हरभरा काढण्याचे काम सुरु आहे तर काही शेतकऱ्यांचा गहू कापणीला आला आहे. मात्र वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी चिंतित झाला आहे. यासोबतच अवकाळी पावसामुळे परिसरात संत्र्याच्या अंबिया बहारचे नुकसान झाल्याची माहिती आहे.