कमल शर्मा / मोरेश्वर मानापुरे, नागपूर: राज्यातील २.४१ कोटी वीज ग्राहकांचे अस्तित्वातील जुने मीटर बदलवून त्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेला प्रारंभीच ग्रहण लागले आहे. कंपन्या आर्थिक संकटात आल्याने ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणारे काम थांबले आहे. मीटर लावण्यासाठी एकूण १४ हजार ५४७ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. या चार कंपन्यांना ३१ डिसेंबरपर्यंत काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई वगळता उर्वरित राज्यात हा मुहूर्त टळला आहे. आता हे काम नवीन वर्षात ३१ मार्चपर्यंत सुरू होण्याचे बोलले जात आहे. यावर अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.
कंपन्यांकडे ९३ महिन्यांपर्यंत मीटर दुरुस्तीची जबाबदारी
विरोधानंतरही महावितरणने भांडुप, कल्याण, कोकण, बारामती आणि पुणे येथे १.१६ कोटी मीटर बसविण्याचे काम अदानी पावरला दिले आहे. कंपनीने वीज वितरण करणाऱ्या मुंबईच्या या भागात मीटर बदलविणे सुरूही केले आहे. याशिवाय लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या भागात २७.७७ लाख नवे मीटर लावण्याचे काम एनसीसीला दिले आहे. हीच कंपनी नाशिक आणि जळगाव येथे २८.८६ लाख मीटर बसविणार आहे. दुसरीकडे जीनस कंपनीला अमरावती विभागात २१.७६ लाख आणि मोन्टी कार्लो कंपनीला नागपूर विभागात ३०.३० लाख मीटर बदलविण्याचे काम दिले आहे. या सर्व कंपन्यांमध्ये अदानी वगळता अन्य कंपन्या ३१ डिसेंबरची डेडलाईन पूर्ण करण्यास अपयशी ठरल्या आहेत.
या सर्व कंपन्यांना २७ महिन्यांत मीटर बसविणे आणि ९३ महिन्यांपर्यंत दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या कंपन्या आतापर्यंत मीटर बदलविण्याकरिता डाटा सेंंटर आणि जीपीएस सिस्टम यंत्रणा विकसित करण्यासह अन्य आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. संपूर्ण देशात स्मार्ट प्रीपेड मीटरची मागणी आहे. यामुळेच कंपन्यांसमोर समस्या उभ्या राहिल्या आहेत. शिवाय आर्थिक संकट आल्याचे बोलले जात आहे. ३१ डिसेंबरला पाच दिवस उरले आहे. त्यानंतरही मोन्टी कार्लो कंपनी आतापर्यंत कार्यालयही सुरू करू शकले नाही.
विदर्भात बदलले जाणार ५२ लाख मीटर
विदर्भात एकूण ५२ लाख ६ हजार ९८२ स्मार्ट मीटर बदलले जाणार आहेत. यामध्ये ट्रान्सफॉर्मर आणि फीडरमध्ये लागणाऱ्या मीटरचा समावेश आहे. सर्वाधिक ९ लाख ४५ हजार ६२३ मीटर नागपूर शहरात बसविण्यात येणार आहे. नागपूर ग्रामीणमध्ये ३ लाख ४४ हजार २२५, अकोला ३,८३,५२५, बुलढाणा ४,६७,२८३, वाशिम १,९२,१५१, अमरावती ६,३२,७६७, यवतमाळ ५,००९१०, चंद्रपूर ४,१४,६६७, गडचिरोली ३,२५,६७५, गोंदिया २,९८,३४७, भंडारा २,९१,८८३ आणि वर्धा येथे ३,९८,८०९ स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे.