लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ येऊ लागल्याने पोलिसांनीही विसर्जन बंदोबस्ताची तयारी केली आहे. विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या आणि ५७५ होमगार्डस्सह अडीच हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार आहेत.विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलाने तयारी केली आहे. महापालिकेच्या मदतीने शहरात जागोजागी कृत्रिम टॅन्क निर्माण करून तेथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक गणपती जास्तीत जास्त प्रमाणात फुटाळा तलावात विसर्जित करण्यात येतात. त्यामुळे फुटाळावरही पोलिसांनी तयारी केली आहे. शिवाय शहराच्या विविध भागातून येणाऱ्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. १ आणि २ सप्टेंबरला पोलिसांचा बंदोबस्त राहील. त्यासाठी सात डीसीपी, ११ एसीपी आणि ६४ पोलीस निरीक्षक बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या सोबतीला १८५ सहायक आणि उपनिरीक्षक, १५८१ पोलीस कर्मचारी तसेच ५७५ होमगार्ड राहणार आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या बंदोबस्त सांभाळणार असून शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, वज्र वरुण असे सर्व तयार ठेवण्यात येणार आहे.१ आणि २ सप्टेंबरला शहरातील काही भागातील मार्गावर वाहतूक बदल केला जाणार आहे.गणेश विसर्जनासाठी भाविकांची फुटाळा तलावाकडे जाताना रस्त्यावर गर्दी होऊ नये आणि त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून वाहतूक वळविली आहे. त्यानुसार पूर्व नागपुरातून येणाऱ्या वाहनांसाठी सेंट्रल एव्हेन्यू, जयस्तंभ चौक, एलआयसी चौक, सदर पोलीस स्टेशन, वेकोलि, दूध डेअरी आणि तेलंखेडी हनुमान मंदिर मार्गे फुटाळा असा मार्ग राहणार आहे.गणेशपेठ, मानस चौक, मॉरिस कॉलेज टी-पॉईंट, संविधान चौक, सदर पोलीस स्टेशन आणि पुढे फुटाळा.सीताबर्डीतुन व्हेरायटी चौक, महाराजबाग, रविनगर चौक, भरतनगर चौक, तेथून फुटाळा. वायुसेना कमांड प्रवेशद्वाराकडून फुटाळाकडे येणाºया मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुना अमरावती नाका ते फुटाळा चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीवर आवश्यकतेनुसार निर्बंध घातले जाणार आहेत. अमरावतीकडून येणारी वाहतूक वाडी टी-पॉईंट, हिंगणा मार्गे वळविली जाणार असून, आवश्यकतेनुसार मारुती सेवा मोटर्स येथून वायुसेना मार्गे किंवा जुना अमरावती नाका चौक येथून उजवीकडे अंबाझरी मार्गे वाहतूक व्यवस्था वळविली जाणार आहे.
विसर्जन बंदोबस्ताची नागपूर पोलिसांकडून तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 1:29 AM