१४ सप्टेंबर रोजी आगमन : मनपा व ‘व्हीएनआयटी’च्या कार्यक्रमांना राहणार उपस्थित नागपूर : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे १४ सप्टेंबर रोजी नागपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते नागपूर महानगरपालिकेचा १५० वा वर्धापनदिन सोहळा तसेच ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) दीक्षांत समारंभात उपस्थित राहतील. राष्ट्रपती भवनाकडून पूर्ण वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यानिमित्त प्रशासनाची तयारी युद्धस्तरावर सुरू असून वरिष्ठ पातळीवर बैठकांचा जोर वाढला आहे.सोमवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वायुसेनेच्या विशेष विमानाने दिल्लीहून नागपूरकरिता प्रयाण करतील. सायंकाळी ५.५५ वाजता राष्ट्रपतींचे नागपुरात आगमन होईल. ते विमानतळाहून थेट मनपाच्या १५१ व्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाकडे रवाना होतील. सायंकाळी ६.३० वाजता ते कार्यक्रमस्थळी पोहोचतील. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती राहील. राष्ट्रपतींच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे भूमिपूजन करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. सोबतच स्मरणिकेचे विमोचनदेखील त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमासाठी पाऊण तासाचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)काही मार्गांवरील वाहतूक बंदराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी सुरक्षेची खबरदारी म्हणून शहरातील काही रस्त्यांवरील वाहतूक काही वेळासाठी टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांवर बंदी राहणार आहे. कार्यक्रमाच्या वेळेत वाहनचालकांनी आपली वाहने दुसऱ्या मार्गाने न्यावीत असे पोलिसांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.सिव्हिल लाईन्समध्ये तयारीला वेगराष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त सिव्हिल लाईन्स परिसरात तयारीला वेग आला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे सुरू असून स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात येत आहे. राष्ट्रपतींच्या मार्गात कुठलाही अडथळा येऊ नये याकरिता रस्त्याच्या कडेला झालेली विविध अतिक्रमणेदेखील उठविण्यात आली आहे.राज्यपाल सोमवारी येणारराष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी राज्यपाल सी.विद्यासागर राव हे सोमवारी सकाळी १०.२० वाजता नागपुरात दाखल होत आहेत. सायंकाली ५.५५ वाजता ते स्वत: विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत करतील. मनपा तसेच ‘व्हीएनआयटी’च्या कार्यक्रमांना त्यांचीदेखील उपस्थिती असेल. मंगळवारी सायंकाळी ५.१० वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील. हे मार्ग टप्प्याटप्प्याने राहतील बंद१४ सप्टेंबर (सायंकाळी ५ ते ७)नागपूर विमानतळ, रहाटे कॉलनी चौक, संविधान चौक, लेडिज क्लब चौक, राजभवन, जुना काटोल नाका चौक, पागलखाना चौक ते मानकापूर क्रीडा संकुल१५ सप्टेंबर ( सकाळी १०.३० ते १२.३०)राजभवन ते लेडीज क्लब चौक, लॉ कॉलेज चौक, रविनगर चौक, रामनगर चौक, यशवंतनगर पोलीस चौकी ते व्हीएनआयटी, व्हीएनआयटी ते माटे चौक, लक्ष्मीनगर चौक, हॉटेल प्राईड ते विमानतळ
राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तयारी युद्धस्तरावर
By admin | Published: September 13, 2015 2:53 AM