नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात गरबा आयोजनाची तयार अंतिम टप्प्यात आहे. नागपूर शहरात जवळपास ४२ ठिकाणी गरबाचे आयोजन होणार असून तयारी जोरात सुरू आहे. क्वेटा क्वॉलनी, वर्धमाननगर, सिव्हिल लाईन्स, धंतोली, रामदासपेठ, नंदनवन, गरोबा मैदान आदींसह मोठे सभागृह आणि खुल्या मैदानात गरब्याचे आयोजन होणार आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये उत्साह संचारला आहे. तरुणाई ड्रेसेस, आर्टिफिशियल ज्वेलरी, टिपऱ्या आणि अन्य साहित्यांच्या खरेदीत गर्क आहे. राऊंडर स्पिनर टिपरीला सर्वाधिक मागणी आहे. नागपुरात जवळपास १२ ते १५ लाख रुपयांचा टिपऱ्या विकल्या जात असल्याची माहिती आहे.
विविध ठिकाणी गरब्याचे प्रशिक्षण
गेल्या १५ दिवसांपासून गरब्याच्या आयोजनास्थळी वा हॉलमध्ये गरब्याचे प्रशिक्षण सुरू आहे. गरबा हा गुजरातील लोकांचा सण आहे. पण या सणाचे आयोजन महाराष्ट्रासह नागपुरातही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांचा या सणामध्ये मुख्यत्त्वे गरब्यामध्ये सहभाग असतो. गरबा प्रशिक्षणात महाराष्ट्रीय तरुण-तरुणींचा जास्त सहभाग असतो. १५ दिवसांच्या प्रशिक्षणाचे ३ ते ५ हजार रुपये आकारले जातात. किमान गरब्याच्या थोड्याफार स्टेप्स याव्यात, असा सर्वांचा अट्टाहास असल्याने ते प्रशिक्षणाला आवर्जून हजेरी लावतात.
आता डिझायनर झाल्या टिपऱ्या, गुजरातेतून येतात विक्रीला
विक्रेते पंकज पडिया म्हणाले, गरबा आता भक्ती आणि मस्तीचा संगम झाला आहे. लोकांच्या उत्साहाप्रमाणेच टिपऱ्या अर्थात दांडिया स्टिक डिझायनर झाल्या आहेत. त्यामुळेच टिपऱ्यांचे व्यावसायिकरण झाले आहे. नवनवीन स्वरुपात पाहायला मिळत आहे. बाजारात ३० ते ४० प्रकारच्या टिपऱ्या विक्रीस आहेत. जोडीची किंमत १०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत आहे. टिपऱ्यांच्या कलेक्शनमध्ये सिंपल वुडन, मेटल विथ लटकन, लटकनविना, गोल्डन, सिल्व्हर, पोपट, डबल, तीन कलर, तिरंगा, सदाबहार सनखेडा, अजमेरी बांधनी आणि लहानांसाठी स्पिनर टिपऱ्यांचा स्टॉक आहे. तरुणाईची सर्वाधिक मागणी राऊंडर स्पिनर टिपरीला असते.
दांडिया नाईटचे आयोजन वेगवेगळ्या थीमवर करण्यात येते. जोडप्याला स्वत:च कपडे, जोडे, ज्वेलरी आणि अन्य वस्तूंची जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे बाजारात गरब्याशी जुळलेल्या वस्तूंची मागणी वाढली आहे. डिझायनर ड्रेसेस, ज्वेलरीमध्ये इअरिंग, मल्टी कलर अंगठी, हात आणि पायाचे कडे, कंबर पट्टा, बाजूबंध आणि अन्य वस्तू विक्रीस आहेत. याची रेंज ५० रुपयांपासून एक हजारांपर्यंत आहे.