लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - विदर्भातील तिन्ही व्याघ्र प्रकल्पांत वाघांची संख्या वाढल्याने या भागात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे विदर्भातीलवाघ पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व इतर भागात स्थलांतरित करण्याची तयारी केली जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांनी गुरुवारी आयाेजित वेबिनारमध्ये याविषयी माहिती दिली.
राज्यात सध्याच्या घडीला ३१२ वाघ आहेत. त्यातील ३०० च्या जवळपास वाघ केवळ विदर्भात आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात ६५ तर चंद्रपूरच्या ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात १८० च्यावर वाघ आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची जैवविविधता आणि जंगल वाघांच्या अधिवासासाठी चांगले ठरले असून या भागात वाघांची संख्याही वाढली आहे. मात्र, संख्या वाढल्याने टेरिटरीसाठी त्यांचा आपसातील संघर्षही हाेत असून अर्धे अधिक वाघ जंगलाबाहेर येत आहेत. जंगलाबाहेर येणारे वाघ मानवी वस्त्यांमध्ये शिरले असून यामुळे माणसांशी संघर्ष वाढला आहे. दरवर्षी माणसे व पाळीव प्राणी त्यांचे बळी ठरले आहेत. हा संघर्ष टाळण्यासाठी विदर्भातल वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व इतर भागात स्थलांतरित करण्याची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. माहितीनुसार तज्ज्ञ अभ्यासक व भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली हाेती. राज्य शासनाने वन्यजीव व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या १० वर्षांच्या कृती आराखड्यातही ही याेजना आखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात विदर्भातील वाघ सह्याद्री जंगलातही दिसतील, ही शक्यता आहे.
वनभवनात जागतिक व्याघ्र दिन साजरा
जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून गुरुवारी वनभवन, नागपूर येथे राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामावर आधारित वेबिनारचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विकासकामे करताना वने व वन्यजीवांना बाधा हाेणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. राज्याचे पर्यावरण, वातावरण बदल व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित हाेते. या वेबिनारदरम्यान ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर, नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक डाॅ. ज्याेती बॅनर्जी, सह्याद्री प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये हाेणाऱ्या विविध कामांची, उपक्रमांची माहिती दिली. डब्लूआरटीसी, गाेरेवाडाचे संचालक डाॅ. शिरीष उपाध्याय यांनी केंद्राची माहिती दिली. प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी आभार मानले. संचालन स्नेहल पाटील यांनी केले.