लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम असला तरी, प्रशासनाने हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच एक अधिवेशन उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूरला घेण्यात येते. विदर्भातील प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याच्या हेतूने हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची परंपरा आहे. मागील वर्षी पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले होते. मात्र पावसामुळे सरकारची चांगलीच फजिती झाली. पावसाचे पाणी विधानभवन परिसरात साचले. पाणी इलेक्ट्रिक डीपी असलेल्या कक्षात साचले. यामुळे संपूर्ण वीजव्यवस्था बंद पडली होती. परिणामी अधिवेशनच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन सरकारने मुंबईला घेतले. आता पुन्हा हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे. नागपूरला होणारे यंदाचे चौथे अधिवेशन असणार असल्याचे सांगण्यात येते. सत्ता स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशानाची अधिकृतपणे तारीख जाहीर होणार असली तरी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. येथे तयार करण्यात येत असलेल्या इमारतीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. सत्ता स्थापनेवरून सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सत्तेच्या समीकरणाबाबत रोज नवीन चर्चा कानावर येत आहे. सत्तेच्या स्थापनेवरच हिवाळी अधिवेशनाची वेळ ठरणार आहे. इतिहास पाहता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साधारणत: अधिवेशनाचे सत्र सुरू होते. त्यामुळे प्रशासनाकडून महिनाभराचाच काळ शिल्लक आहे.विधानभवनातील नवीन इमारतीचे बांधकामही जोरातनागपुरातील विधानभवन परिसरात नवीन इमारत तयार करण्यात येत आहे. याचे कामही जोरात सुरू आहे. अधिवेशनापूर्वी इमारतीचे काम पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.विधानभवन परिसरात एक तीन माळ्यांची इमारत तयार करण्यात येत आहे. कॅन्टीन तोडून ही इमारत तयार करण्यात येत आहे. याच्या पहिल्या म्हणजे तळमजल्यावर सहा मंत्र्यांचे रूम राहणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या माळ्यावर सुद्धा सहा मंत्र्यांचे रूम तयार करण्यात येत आहे. तर तिसऱ्या माळ्यावर कॅन्टीन असणार आहे. या इमारतीच्या लगत असलेल्या विधान परिषद इमारतीचे सौंदर्य लक्षात घेऊनच याचे बांधकाम करण्यात येत आहे. विधान परिषद असलेली इमारत इंग्रजकालीन आहे. या इमारतीकरिता वापरण्यात आलेल्या विटा विशेष पद्धतीच्या आहेत. अशाच पद्धतीच्या विटा व दगडाचा उपयोग या नवीन इमारतीच्या बांधकामाकरिता करण्यात येत आहे.इलेक्ट्रीक डीपीसाठी नवीन इमारतमागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा इलेक्ट्रिक डीपीसाठी नवीन इमारत करण्यात येत आहे. या इमारतीच्या वरच्या भागात ही डीपी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कितीही पाऊस आला तरी याचा कोणताही परिणाम होणार नाही. या इमारतीचे कामही जोरात सुरू आहे.
नागपुरात हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:44 AM