कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसगार्मुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याला विरोध होत असतानाच दुसरीकडे विधानभवनाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंत्र्यांच्या दालनांसाठी हुबेहूब जुन्या इमारतीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. १० कोटी ८३ लाख रुपयांच्या या इमारतीमध्ये १२ मंत्र्यांची अत्याधुनिक दालने राहणार आहेत. तर वरच्या माळ्यावर उपाहारगृह तयार करण्यात आले आहे.
इंग्रजांच्या संकल्पनेतून १९१७ मध्ये बांधण्यात आलेल्या विधानभवनाच्या जुन्या इमारतीला हेरिटेजचा दर्जा प्राप्त आहे. त्याला जोडूनच नवीन इमारत बनविण्यात आली आहे. याचे एकूण डिझाईन हे जुन्या इमारतीप्रमाणेच आहे. दोघांची उंचीदेखील सारखीच असल्याने बाहेरून काहीच फरक जाणवत नाही. जुनी इमारत ही दोन मजल्यांची होती तर नवीन इमारत तीन मजल्यांची आहे. तळमजला व पहिल्या मजल्यावर सहा-सहा दालने आहेत. दुसऱ्या माळ्यावर मंत्री व आमदारांसाठी उपाहारगृह तयार करण्यात आले आहेत. तेथे मांसाहारी व शाकाहारी भोजनासाठी वेगवेगळे स्वयंपाकघर आहे. शिवाय नाश्त्यासाठीदेखील एक उपाहारगृह तयार करण्यात आले आहे. येथे बनविण्यात आलेल्या १२ पैकी आठ दालनेजवळपास ३२० चौरस फुटाचे आहेत. यात मंत्र्यांसाठी अँटी चेम्बरदेखील आहेत. उर्वरित चार केबिनमध्ये अँटी चेम्बर नसून त्यांचे क्षेत्रफळ २०० चौरस फुटांचे आहे.
विधानभवन सचिवालयातर्फे तयार करण्यात आलेल्या या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने डिसेंबर २०१८ मध्ये सुरू केले होते. आॅगस्ट २०१९ मध्येच हे काम पूर्ण होणार होते. मात्र आराखड्यात बदल झाल्याने हे काम आता पूर्ण होत आहे.राजस्थानातून आणले कामगारनवीन इमारतीला जुन्या इमारतीचा लूक आणण्यासाठी आदासाहून दगड तर बालाघाटमधील विटांचा उपयोग करण्यात आला. दगडांचे काम करण्यासाठी राजस्थानमधून कामगार आणावे लागले. कोरोनामुळे हे कामगार परत गेले होते, अखेर त्यांना आणण्यासाठी नागपुरातून वाहने पाठविण्यात आली.