नागपूर : गुढीपाडवा अर्थातच मराठी नवीन वर्ष. चैत्र आरंभ झाल्याने झाडांना नवीन येणारी पालवी नवी उमेद, नवीन सुरुवातीची जाणीव करून देते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या सणाला फारच मानाचं स्थान आहे. सर्वच सण साजरे करण्यात पुढाकार घेणाऱ्या नागपूरकरांनी गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. शोभायात्रा ही आज गुढीपाडव्याची ओळख बनलेली आहे. महाल, धरमपेठ, लक्ष्मीनगर इत्यादी परिसरात याची तयारी जोरात सुरू आहे. घराघरांप्रमाणेच सामाजिक पातळीवर हा सण उत्साहाने साजरा करण्यात येतो. त्यामुळे धार्मिकसोबतच सामाजिक संघटनादेखील नव्या वर्षाच्या अनोख्या स्वागतासाठी सरसावल्या आहेत. शिवाय ठिकठिकाणी अध्यात्म प्रवचन, पाडवा पहाट, रामरक्षा पठण, महिलांची बाईक रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच शहरातील विविध चौकांमध्ये विविध सामाजिक संदेश देणाऱ्या गुढी उभारण्यात येणार आहेत. याकरिता शहरात तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या असून, नागरिकांचा सहभाग जास्तीतजास्त प्रमाणात व्हावा, याकरिता प्रयत्न सुरू आहेत.सामूहिक रामरक्षा पठणहिंदू रक्षा समितीतर्फे गुढीपाडवा व रामनवरात्रानिमित्त बडकस चौकात सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय रविवारी सकाळी दिंडी काढण्यात येणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती प्रा. भालचंद्र माधव हरदास यांनी दिली आहेचैत्र-पालवी, स्वरगंधारसंस्कार भारतीतर्फे शनिवारी सराळी चैत्र-पालवी पाडवा पहाट हा सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दत्तात्रयनगरस्थित संत ज्ञानेश्वर उद्यान येथे सकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.पारंपरिक वेशभूषेत या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. तर लक्ष्मीनगर येथील बुटी लेआऊट परिसरातील सिद्धगणेश मंदिर येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास स्वरगंधार या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन होईल.माजी सैनिक उभारणार एकजुटीची गुढीदेशसेवेच्या कामातून मुक्त झाल्यानंतर उद्योग क्षेत्रात उतरलेल्या माजी सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व माजी सैनिक उद्योजकांची एकजूट आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र माजी वायुसैनिक कल्याण संघटनेने पुढाकार घेतला असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने उद्योजक माजी सैनिकांना संघटित करण्यात येणार आहे. मात्र निवृत्तीनंतर त्यांना सरकारकडून त्यांना कारकुनीचे काम सोपविले जाते. त्यांच्या कौशल्याचा उपयोग होत नाही. नागपूरच्या मिहानमध्ये बोईंगसह इतही अनेक उद्योग येऊ घातले आहे. तेथे माजी सैनिकांच्या कौशल्याचा उपयोग होऊ शकतो.काही माजी सैनिकांनी स्वकर्तृत्त्वावर उद्योग क्षेत्रात झेप घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ इतही माजी सैनिकांना होऊ शकतो. हे लक्षात घेऊनच उद्योग क्षेत्रातील माजी सैनिकांना एकत्रित करून खामला येथील कार्यालयात गुढी उभारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आहे. या उपक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष मनोहर भातकुलकर, सचिव महेश अंबोकर,पुंडलिक सावंत, संदेश सिंगलकर, चंद्रशेखर कुळकर्णी, श्रीकांत गंगाथडे, हेमंत बांते, देवेंद्र ठाकूर, सचिन खेडीकर, रमेश गायकवाड प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)
गुढीपाडव्यासाठी उपराजधानी सज्ज
By admin | Published: March 20, 2015 2:23 AM