लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत शुक्रवारीदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास तासभर चांगला पाऊस आला. यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. दिवसभर आकाशात काळे ढग दाटून आल्याचे दिसून आले.शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. मात्र जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा नव्हती. १२ च्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता. रात्री ८.३० वाजेनंतर परत सुमारे २० मिनिटांसाठी शहरातील अनेक भागात चांगला पाऊस झाला.दरम्यान, हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १.२ मिमी पावसाची नोंद झाली तर सकाळी ८.३० ते ५.३० या कालावधीत नागपूर विमानतळावर १६.६ मिमी पाऊस झाल्याचे नोंदविण्यात आले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासात शहरासह विदर्भाच्या अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात ४ ऑगस्टपर्यंत एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम मध्य भारतावर दिसेल. यामुळे पुढील काही दिवसात चांगला पाऊस होण्याची चिन्हे आहेत.मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातील जलसाठा वाढलादरम्यान नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली येथील मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांतील तलावांचा साठा वाढला आहे. सरासरी २३.९९ टक्के जलसाठे भरले आहेत. मात्र नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह येथे अद्यापही जलसाठा शून्यावरच आहे. ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे.
नागपूर शहरात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:52 AM