लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजनी रेल्वेस्थानक परिसरातील ४४.४ एकर जागेत जागतिक दर्जाचे इंटर मॉडेल स्टेशन बांधणार आहे. त्यावर एक हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे. जाणकारांच्या माहितीनुसार, हे देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन राहणार आहे. उपराजधानीतील रेल्वे विकासाचे हे सर्वात मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे सुविधांचा दर्जा उंचावणार आहे. या प्रकल्पासोबत अजनीला सॅटेलाईट टर्मिनस करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात अधिक रेल्वेगाड्यांचा प्रवास अजनीत संपवता येईल. त्यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावरील दबाव कमी होईल. इंटर मॉडेल स्टेशनकरिता ब्रिटीशकालीन आरओबी तोडून नवीन आरओबी बांधण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महामार्ग प्राधिकरणाने याची परवानगी मिळण्यासाठी रेल्वेला प्रस्ताव सादर केला आहे. अजनी रेल्वेस्थानक चौक ते वर्धा रोडवरील अजनी चौकापर्यंत अलिकडेच सिमेंट रोड बांधण्यात आला आहे. तसेच, मेट्रो मार्गाखाली अजनी रेल्वेस्थानक ते वर्धा रोडपर्यंत नवीन रोड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिटीशकालीन आरओबी तोडणे गरजेचे नसल्याचे जाणकारांचे मत आहे.याशिवाय अजनी चौकातून रहाटे कॉलनी चौकाकडे जाण्यासाठी अंडरपास बांधणे प्रस्तावित आहे. त्याकरिता महामार्ग प्राधिकरणला नीरीची जमीन हवी आहे. नीरीने जमीन देण्यास नकार दिला आहे. मेट्रो रेल्वेही या ठिकाणी काम करण्याची परवानगी देते अथवा नाही हा प्रश्न आहे. एकंदरीत, काम सुरू होण्यापूर्वीच अडथळे निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.दुसऱ्यांदा पाठवला प्रस्तावअजनी रेल्वेस्थानक ते वर्धा रोडपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव चार महिन्यापूर्वी पाठविण्यात आला होता. त्यात काही सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्यांदा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. तो प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयात प्रलंबित आहे.इंटर मॉडेल स्टेशनची वैशिष्ट्ये
- अंडरग्राऊंड पॅसेंजर लाऊंज
- मेट्रो स्टेशन
- फलाटापर्यंत जाण्यासाठी भूमिगत रस्ता
- शहर व एसटी बसेसना प्रथम फलाटपर्यंत जाण्याची व्यवस्था
- २५ वर्षाची गरज लक्षात घेऊन निर्मिती
- बजेट होटेल
- भाड्याने देण्यासाठी कार्यालये
- जागतिक दर्जाचे काम
सॅटेलाईट टर्मिनसच्या कामाला सुरुवातअजनीला सॅटेलाईट टर्मिनस बनविण्याच्या कामाला ऑक्टोबर-२०१८ पासून सुरुवात झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, १८ कोटी रुपयाच्या या कामासाठी सुरुवातीला दीड कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर निधीकरिता प्रकल्प रखडला. गेल्या फेब्रुवारीमध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकल्पाला ८ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यामुळे काम पुन्हा सुरू झाले आहे. हे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.सॅटेलाईट टर्मिनसमधील कामे
- चार नवीन फलाट तयार करणे
- अधिक रेल्वेगाड्या टर्मिनेट करण्यासाठी चार स्टेबलिंग लाईन.
- नवीन ड्रेनेज सिस्टिम
- सर्व्हिस बिल्डिंग, अंडरग्राऊंड आरसीसी वॉटर टँक़
- कॅरेज वॉटरिंग लाईन.
- फूटओव्हर ब्रिजचा विस्तार
- वॉशिंग पिट लाईन.
प्रस्ताव पाठवला आहेमहामार्ग प्राधिकरणने लॅन्ड स्केपिंगचा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयाला पाठविला आहे. तसेच, अजनी सॅटेलाईट टर्मिनस प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे मुख्य रेल्वेस्थानकावरील दबाव कमी होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अजनीतून जास्त रेल्वेगाड्या टर्मिनेट केल्या जातील.कृष्णनाथ पाटील, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.