लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्या येथील राममंदिर परिसरात जमीन समांतर करताना आढळून आलेल्या प्राचीन बुद्ध मूर्ती, अशोक स्तंभ, धम्मचक्र यासह इतर पुरातन वस्तूंचे जतन करण्यात यावे, या मुख्य मागणीसह भारतीय बौद्ध महासभा व इतर संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
गेल्या मे महिन्यामध्ये अयोध्या येथील राममंदिर परिसरात जमीन समांतर करताना सुमारे २५०० वर्षे जुन्या बुद्ध मूर्ती व बौद्ध धर्माशी संबंधित अन्य वस्तू आढळून आल्या. अभ्यासकानुसार, सम्राट अशोक यांच्या काळात या ठिकाणी साकेत हे बौद्ध धर्मीय शहर होते. त्यामुळे या सर्व वस्तूंना ऐतिहासिक महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता पुरातन वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी, राममंदिर परिसरात पुन्हा उत्खनन करून त्याचा विस्तृत अहवाल सरकारला सादर करण्यात यावा, पुरातन वस्तूंचे कार्बन डेटिंग अॅनालिसिस करून अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा, सर्व वस्तूंची लेखी माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात यावेत, या ठिकाणी आतापर्यंत सापडलेल्या सर्व पुरातन वस्तूंचे जाहीर प्रदर्शन करण्यात यावे आणि राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने सर्व प्राचीन वस्तूंचा ताबा स्वत:कडे घ्यावा, अशा अन्य मागण्या सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आल्या आहेत.
याचिकेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, पुरातत्त्व विभागाचे महासंचालक, उत्तर प्रदेश सरकार, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे दिल्लीतील अॅड. बी. के. गौतम, नागपुरातील अॅड. शैलेश नारनवरे आदी वकील कामकाज पाहणार आहेत.