नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत गाजत असलेला राष्ट्रवादी शहर व जिल्हाध्यक्षाचा वाद अखेर पक्षश्रेष्ठींनी आश्चर्यकारक तोडगा काढत निकाली काढला. शहर अध्यक्षपदाची धुरा माजी मंत्री अनिल देशमुख तर ग्रामीण जिल्हाध्यक्षाची धुरा माजी मंत्री रमेश बंग यांच्याकडे सोपविण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकमेकांच्या तक्रारी करणाऱ्या या दोन्ही नेत्यांना आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी कामाला लावण्याकरिता खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी मुंबई येथे बैठक झाली. तीत माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री आ. छगन भुजबळ, आ. दिलीप वळसे पाटील, आ. जयंत पाटील, आ. हेमंत टकले आदी उपस्थित होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी शहर अध्यक्षपदी अनिल देशमुख व जिल्हाध्यक्षपदी रमेश बंग यांच्या नावाची घोषणा केली. नेत्यांचे पाय नेत्यांच्याच गळ्यात नागपूर : प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षपद अजय पाटील यांच्याकडे तर जिल्हाध्यक्षपद बंडू उमरकर यांच्याकडे होते. पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. नवा अध्यक्ष निवडीसाठी आलेल्या निरीक्षकांसमोरही गटबाजीचे प्रदर्शन झाले होते. त्यावेळी प्रदेश पदाधिकारी मुंबईहून अध्यक्षांची घोषणा करतील, असे निरीक्षकांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून अध्यक्षपदाचे भिजतघोंगडे कायम होते. अनिल देशमुख यांच्या गटाकडून अनिल अहीरकर यांचे नाव समोर करण्यात आले होते. तर रमेश बंग व अजय पाटील यांच्याकडून रमण ठवकर यांचे नाव देण्यात आले होते. ग्रामीणमध्ये अनिल देशमुख पुन्हा एकदा बंडू उमरकर यांच्यासाठी इच्छुक होते. तर बंग यांच्या मनात दुसरेच नाव होते. नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी ताकद लावली पण पक्षाने नेत्यांचे पाय नेत्यांच्याच गळ्यात टाकले. यामुळे नेत्यांवर शहर व जिल्हा सांभाळण्याची जबाबदारी लादली गेली असली तरी पदाच्या आशेवर असलेला कार्यकर्ता मात्र नक्कीच हिरमुसला आहे. (प्रतिनिधी)
देशमुखांकडे शहर बंग ग्रामीणचे अध्यक्ष
By admin | Published: September 12, 2015 2:38 AM