नागपूर : आजच्या शिक्षणप्रणालीत अनेक मोठे बदल दिसून येत असून नावीन्यपूर्ण संशोधन आणि उद्यमशीलतेला मोठे प्रोत्साहन लाभत आहे. नवीन विचारांतून समोर येणाऱ्या ‘स्टार्टअप्स’ नवा इतिहास रचत असून, त्यातून अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. विशेषत: शिक्षण व आरोग्य यासारख्या क्षेत्रात तर आमूलाग्र बदलांसह रोजगारनिर्मितीदेखील होत आहे. हे ‘स्टार्टअप्स’ नक्कीच देशासाठी ‘गेमचेंजर’ ठरतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या मिहान परिसरातील नव्या ‘कॅम्पस’चे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा.डॉ. विकास महात्मे, खा.कृपाल तुमाने, ‘आयआयएम’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी,संचालक डॉ. भीमराया मेत्री प्रामुख्याने उपस्थित होते. रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण आहे. तसेच, अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय, महत्त्वाकांक्षा याबाबत आत्मपरीक्षणाची संधी देत असतात, असे राष्ट्रपती म्हणाले. विद्यार्थ्यांनी जगभरात कुठेही काम करत असताना आपल्या देशाची मूल्ये विसरू नयेत. कोणतीही गोष्ट परस्परांमध्ये वाटून घेण्याची आपली संस्कृती राहिली आहे. त्यामुळे आपल्याकडील ज्ञान इतरांनादेखील दिले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी केले. सी.पी. गुरुनानी यांनी प्रास्ताविक केले.
शैक्षणिक हब ही नागपूरची नवी ओळख: गडकरी
नागपूर हे जसे मेडीकल हब, लॉजिस्टीक हब म्हणून वेगाने विकसित होत आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक हब अशीदेखील शहराची ओळख प्रस्थापित होत आहे. विदर्भातील समृद्ध वने व खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी ‘आयआयएम’ने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होईल, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.
विदर्भातील दुर्गम भागातील शाळांचा विकास करावा : प्रधान
मोठ्या ब्रॅंडच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक मोठे लोक व संस्था असतात. मात्र, सीताबर्डीसारख्या बाजारातील फेरीवाल्याकडे कुणीच नसते. तरीदेखील तो व्यवसाय करतो. भारतातील फेरीवाल्यांचा व्यवसाय कसा वाढेल या दिशेने ‘आयआयएम’मधील विद्यार्थ्यांनी नियोजन केले पाहिजे. विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालयांना दत्तक घेऊन विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे व सुटीमध्ये तेथे विद्यार्थ्यांनी जाऊन शिकविले पाहिजे, असा सल्ला धर्मेंद्र प्रधान यांनी दिला.
राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य : देसाई
‘आयआयएम- नागपूर’ला राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य देण्यात येईल. येथून चांगले उद्योजक तयार झाले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. या संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थेशी भागीदारी केली असून विविध देशातील संस्था या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. यातून अनेक तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
‘आयआयएम’ उद्योगांसाठी ‘मॅग्नेट’ ठरणार : फडणवीस
‘आयआयएम’ सारख्या संस्थेतून कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण होते व असे प्रशिक्षित मनुष्यबळ असेल तेथेच उद्योग येतात. त्यामुळे ‘आयआयएम’ विदर्भासाठी ‘मॅग्नेट’ ठरेल, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या मान्यतेनंतर औरंगाबादचा प्रस्तावदेखील गेला होता असे दावे करण्यात आले होते. प्रत्यक्षात प्रस्ताव केवळ नागपूरचाच गेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.