लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवार १७ ऑगस्ट रोजी नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वर्धा येथील कार्यक्रमासाठी ते येत असून नागपुरात राजभवन येथे त्यांचा दोन तास मुक्काम राहील.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतीय हवाई दलाच्या विमानाने सकाळी १०.०५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने वर्धाकडे प्रयाण करतील. वर्धा येथील स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांचे दुपारी १२.५५ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर राजभवनकडे प्रयाण करतील. दुपारी १.२५ वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. दुपारी ३.३० वाजता शासकीय वाहनाने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी ३.५० वाजता नागपूर विमानतळावर आगमन व राखीव. दुपारी ४ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतीय हवाई दलाच्या विमानाने मुंबईकडे प्रयाण होईल.
राष्ट्रपती दौऱ्याच्या निमित्ताने चोख बंदोबस्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवारी वर्धा दौऱ्याच्या निमित्ताने नागपूरला येत आहेत. येथे त्यांचा कार्यक्रम नसला तरी ते दुपारी वर्धा दौरा आटोपल्यानंतर राजभवनात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या खास उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, रस्ता बंदोबस्ताची रंगीत तालिमही करून घेण्यात आली आहे. भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी सकाळी १०.५ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. विमानतळावरून १०.१५ वाजता हेलीकॉप्टरने वर्धा येथे जातील. तेथून १२. ५५ ला परत येतील आणि विमानतळावरून राजभवनला पोहचतील. दुपारी ३.३० वाजता राजभवनातून विमानतळाकडे रवाना होतील. विमानतळावरून राजभवनात आणि परत विमानतळाकडे येताना ज्या मार्गाची पोलिसांनी निवड केली, तो मार्ग (रस्ता) दोहोबाजूने सील करण्यात आला आहे. या मार्गावर बंदोबस्तासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे. विमानतळावर आणि राजभवनाच्या सभोवतालही कडक बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी शहर पोलीस दलातील ४ पोलीस उपायुक्त, ३ सहायक आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, ५४ उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक, ४७३ पुरुष तर ६३ महिला कर्मचारी हा बंदोबस्त सांभाळणार आहेत. याशिवाय एसआरपीएफ, आरसीपी आणि क्यूआरटीही मदतीला राहणार आहेत. विमानतळ ते राजभवनपर्यंतच्या मार्गावर वॉचर आणि गुप्तचरही पेरण्यात आले आहे. राष्ट्रपती कोविंद यांचा नागपुरात कोणताही कार्यक्रम नसला तरी सुरक्षा मात्र पूर्वीपेक्षाही कडक राहणार आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्यात बुलेट प्रूफ वाहनांचा आणि फ्रिक्वेन्सी जॅमरचाही समावेश असतो. ती व्यवस्था करण्यात आली आहे. ऐनवेळी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास काय करायचे, हे ध्यानात घेत सुरक्षा यंत्रणेकडून सेफ झोन तयार करण्यात आले आहे. बाहेरून बोलावून घेण्यात आलेले पोलिसांचे मनुष्यबळ या मार्गावर तैनात करण्यात आले.
वरिष्ठांची धावपळ राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अखिल भारतीय संमेलन शनिवारी नागपुरात पार पडणार आहे. त्यासाठी सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधीश या संमेलनात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. एकीकडे राष्ट्रपती आणि दुसरीकडे सरन्यायाधीशांचे एकाच दिवशी आगमन होणार असल्याने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्ली मुंबईवरून आलेल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या रात्रीपर्यंत बैठका सुरू होत्या.