जि.प.मध्ये ९० टक्के नवे चेहरे : आरक्षण सोडत जाहीर नागपूर : या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे. मंगळवारी झालेल्या सोडतीत बेलोना, खात-निमखेडा, बेसा, इसासनी व सोनेगाव- निपाणी हे पाच सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाले. त्यामुळे आता या पाच सकर्लमधूनच जिल्हा परिषदेला नवा अध्यक्ष मिळणार आहे. सर्वच प्रमुख पक्ष या पाच सर्कलवर लक्ष केंद्रित करतील व तगडा उमेदवार रिंगणात उतवरून त्याला भक्कम पाठबळ देतील. जि.प.सर्कचे संवर्गनिहाय आरक्षण जाहीर केल्यानंतर महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आरक्षणात बचावलेल्या पुरुष सदस्यांना महिला आरक्षणात मात्र धक्का बसला. जि.प. अध्यक्ष निशा सावरकर भाग्यवान राहिल्या. त्यांचे चिरव्हा-धानला सर्कल यावेळी सर्वसाधारण झाले. गेल्यावेळी त्यांचे पतीदेखील शेजारच्या खात-रेवराल या मतदारसंघातून लढले होते. त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या वेळी ते निशाताई यांच्या जागेवर चिरव्हा-धानला येथून लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आरक्षणाने जरी निशा सावरकर यांना साथ दिली असली तरी त्या निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता कमी आहे. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांचे तेलकामठी सर्कल अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. प्रसंगी कुंभारे हे शेजारच्या मतदारसंघातून लढतील, अशी शक्यता होती. मात्र, शेजारचे सर्वच मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांना कुठेही संधी नाही. शिवसेनेचे नेते व जि.प.चे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांचीही संधी हुकली आहे. ते कन्हान पिपरी या सर्कलमधून विजयी झाले होते. कन्हान ही नगर परिषद झाली. त्यामुळे हे सर्कल रद्द करण्यात आले व उर्वरित गावे गोंडेगाव व टेकाडी (कोयला खदान) या दोन सर्कलला जोडण्यात आली.टेकाडी हे अनुसूचित जातीसाठी तर शेजारचे गोंडेगाव हे सर्वसाधारण झाले आहे. मात्र, गोंडेगाव येथे भाजपच्या विद्यमान जि.प. सदस्य कल्पना चहांदे या कायम आहेत. त्यामुळे युती झाली तर डोणेकरांना डच्चू मिळेल. युती न झाल्यास मात्र ते शिवसेनेकडून येथून रिंगणात उतरू शकतात.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गोतमारे या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी- निलडोह या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. यावेळी या सर्कलचे दोन भाग होऊन वानाडोंगरी व निलडोह असे दोन स्वतंत्र सर्कल तयार झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सर्कल नामाप्र सर्वसाधारण झाले आहेत. त्यामुळे गोतमारे यांना दोन्हीकडे संधी आहे. मात्र, त्या निलडोहला पसंती देतील, अशी शक्यता आहे. जि.प. सदस्या अरुणा मानकर यांचे धापेवाडा सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. त्या आता शेजारच्या ब्राह्मणी (सर्वसाधारण महिला) सर्कलमधून रिंगणात उतरू शकतात. माजी जि.प. अध्यक्ष रमेश मानकर यांचे हे जुने सर्कल होते. काँग्रेसचे नाना कंभाले व कुंदा आमधरे यांच्या सर्कलची पुनर्ररचना झाली आहे. त्यामुळे गावांची मोठी फेरफार झाली आहे. असे असले तरी कामठी तालुक्यातील चारपैकी तीन जागा सर्वसाधारण झाल्यामुळे यांना संधी आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या नंदा नारनवरे यांचे नांद सर्कल व शिवकुमार यादव यांचे टेकाडी (कोळसा खदान) सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. याचा दोघांनाही फटका बसला आहे. भाजपचे रुपराव शिंगणे यांचे खापरी- डोंगरगाव हे सर्कल बेसामध्ये समाविष्ट झाले असून अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाले आहे. सुरेंद्र शेंडे यांचे पाटणसावंगी सर्कल अनुसू्चित जमातीसाठी राखीव झाले आहे. अंबादास उके यांचे डिगडोह सर्कल सर्वसाधारण महिला झाले आहे. त्यामुळे यावेळी हे रिंगणात न दिसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या उज्ज्वला बोढारे यांचे रायपूर सर्कल इसासनी (अनुसूचित जाती महिला) व वडधामना (अनुसूचित जमाती महिला) या दोन सर्कलमध्ये विभागले गेले आहे. त्यामुळे बोढारे यांना दुसरे सर्कल शोधावे लागणार आहे. रामटेक तालुक्यातील पाचपैकी पथरई-वडंबा, कांद्री सोनेघाट, मनसर शितलवाडी व नगरधन-भांडारबोडी हे चार सर्कल सर्वसाधारण झाले आहेत. तर बोथिया पालोरा हे नामाप्र झाले आहे. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व जि.प सदस्य शांता कुंभरे, गोंगपाच्या माजी सभापती दुर्गावती सरियाम, शिवसेनेच्या माजी सभापती वर्षा धोपटे यांना संधी आहे. (प्रतिनिधी)
पाच सर्कल ठरविणार अध्यक्ष
By admin | Published: October 06, 2016 3:01 AM