लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस दलात विशेष उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांध्ये खडतर, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणारे जवान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंना गणराज्य दिन तसेच स्वातंत्र्य दिनाला विविध पदक देऊन सन्मानित केले जाते. या पार्श्वभूमीवर, गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्या राज्यातील २०७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांचेही नाव आहे. कर्तव्यकठोर आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून पुरंदरे ओळखले जातात. त्यांना मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याचे कळताच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आरपीएफचे राणे, बोरकर यांना भारतीय पोलीस पदकरेल्वे सुरक्षा दलातील भगवान राणे, आर. के. बोरकर यांना भारत सरकारने २०१९ मध्ये भारतीय पोलीस पदक जाहीर केले आहे. भगवान राणे हे आरपीएफमध्ये १९८७ ला भरती. झाले. त्यांनी ३३ वर्ष उत्कृष्ट सेवा दिली. सेवेदरम्यान त्यांना दोन वेळा पदोन्नती देण्यात आली. अखेर त्यांनी सहायक उपनिरीक्षक (चालक) पदावरून सेवानिवृत्ती घेतली. आपल्या कार्यकाळात त्यांनी नागपूर विभागात कार्य केले. विना अपघात अधिकाºयांची गाडी चालविली. बंद, रेल्वे रोको आणि व्हीआयपी बंदोबस्तासारख्या ड्युटीत त्यांनी अविस्मरणीय योगदान दिले. आर. के. बोरकर आरपीएफच्या नागपूर विभागात १९९९ पासून कार्यरत आहेत. त्यांना प्रधान आरक्षक पदी पदोन्नती देण्यात आली. त्यांनी गोंदिया येथे कर्तव्यावर असताना इमानदारी, कार्यकुशलता दाखवून आपल्या कामाचा परिचय दिला. २०१२ मध्ये त्यांना डीजी इनसिग्नियाने सन्मानित करण्यात आले होते.
पाच युद्ध सैनिकांना मिळणार महाराष्ट्र गौरव पुरस्कारयुद्धांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रात स्थायी असलेल्या सेनेच्या अधिकारी व सैनिकांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी नागपुरातील पाच अधिकाऱ्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. यात एअर कमाडोर संजीव गोसेवाडे (वायुसेना मेडल), ग्रुप कॅप्टन अभिजित देशपांडे (विशिष्ट सेवा पदक), ब्रिगेडिअर अभिजित पेंढारकर (युद्ध सेवा मेडल), लेफ्टनंट कर्नल प्रवीण खानझोडे (सेना मेडल), ग्रुप कॅप्टन रवी पाठक (वायुसेना पदक) यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाकडून विशेष निधी देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो.