नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नागपूर पोलीस दलाचे अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
नागपुरातून हा मान पटकाविणारे ते या वर्षातील एकमेव अधिकारी आहेत. संजय पाटील यांनी याअगोदर राज्यात संगमनेर (उपअधीक्षक), मालेगाव (अपर पोलीस अधीक्षक), नंदुरबार (पोलीस अधीक्षक) येथेदेखील कार्य केले आहे. विशेषत: या भागात दंगली उसळल्या असताना पाटील यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने स्थिती हाताळली होती. त्यांच्याच प्रयत्नामुळे नंदुरबार जिल्ह्यात दोषसिद्धीचा दर वाढला होता. २०१४-१६ या कालावधीत ते पुणे येथे पासपोर्ट अधिकारी म्हणून कार्यरत होते व त्या काळात त्यांनी अर्ज प्रक्रियेला लागणारा वेळ कमी करण्यात यश मिळविले होते. विशेषत: विदेशी नागरिकांसाठी त्यांनी विविध सेवा सुरू केल्या होत्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे २०१५ साली महात्मा गांधी शांतता पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला होता. नागपुरात त्यांच्या प्रयत्नांमुळे मकोका आणि एमपीडीएच्या कारवाईत वाढ झाली. त्याचप्रमाणे एनडीपीएसच्या प्रकरणांमध्ये कारवाया वाढल्या.