विदर्भ विकास मंडळ : इच्छुकांमध्ये रस्सीखेच
नागपूर : राज्य सरकारच्या कामकाजाला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. प्रकाश डहाकेंना पायउतार होऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार बिहारच्या निवडणुकाही पार पडल्या, आता हिवाळी अधिवेशनही झाले. परंतु अद्यापही विदर्भ विकास मंडळाच्या अध्यक्षपदावर कुणाचीही वर्णी लागलेली नाही. एकीकडे अध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपामध्ये या पदासाठी अनेकांनी दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना कुणाचीही नाराजी स्वीकारायची नसल्याने, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत.मुख्यमंत्र्याच्या जिव्हाळ्याचे हे मंडळ असल्यामुळे मंडळाला २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. विदर्भ वैधानिक विकास मंडळातून वैधानिक हे नाव गाळून विदर्भ विकास मंडळाच्या नावाने नामकरण झाले. मंडळावर सरकारने नव्या अभ्यासगटाची स्थापना करून, सदस्यांच्या अभ्यासालाही सुरुवात झाली. मंडळाची इमारतही प्रशस्त झाली. मात्र मंडळाच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचा मुख्यमंत्री तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद असायचे. मंडळाच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार यावेळी मंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर हे पद पश्चिम विदर्भाकडे राहिलेले आहे. मात्र यावेळी परंपरेला खीळ बसण्याची शक्यता आहे. भाजपाच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची येथे वर्णी लागावी, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. विदर्भात भाजपाच्या तुलनेत सेनेला अल्पबळ असल्याने, सेनेचा जोर कमजोर पडतो आहे. तर भाजपाच्या फळीतील दावेदाराची संख्या वाढते आहे. विदर्भातील भाजपाचे अनेक दिग्गज कॅबिनेटचा दर्जा असलेल्या या मंडळावर येण्यास इच्छुक आहेत. यात आ.सुनील देशमुख, आ. कृष्णा खोपडे, माजी आमदार व मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण अडसड यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. कृष्णा खोपडेंना भाजपाने शहर अध्यक्षाच्या जबाबदारीतूनही मोकळे केले आहे. स्थानिक नेतृत्वासाठी त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. विदर्भ विकास मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे शिवसेना विदर्भात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षपदासाठी आग्रही आहे. विदर्भात शिवसेनेला राज्यमंत्र्याच्या स्वरूपात मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. शिवसेनेत अभ्यासू व्यक्तिमत्त्व व विधिमंडळाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्या नावाच्या चर्चेला मध्यंतरीच्या काळात जोर धरला आहे. कारण विदर्भात शिवसेनेच्या अस्तित्वासाठी हे पद महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)