मेंढेंनी करवून घेतली बदली : लोखंडेही बदलीच्या प्रतीक्षेत लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार बघण्यात अधिकाऱ्यांना रसच नसल्याचे दिसते आहे. दीड वर्षांपूर्वी सतीश मेंढे यांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी म्हणून बढती मिळवून घेतली होती. मात्र असे काय झाले की त्यांनी विनंती करून स्वत:ची बदली करवून घेतली. मेंढे यांच्याबरोबरच प्राथमिकचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडेसुद्धा बदलीच्या मानसिकतेत असल्याची चर्चा आहे. त्यांनीही विनंती बदलीची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमागे पदाधिकारी आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही यंत्रणेच्या दबावात अधिकारी काम करीत असल्याची जि.प.मध्ये चर्चा आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाचा कारभार मोठा आहे. १५०० च्यावर शाळा तर ५०,००० च्या जवळपास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असा व्याप आहे. हा कारभार सांभाळताना अधिकाऱ्यांवर पदाधिकारी, वरिष्ठांबरोबरच शाळा संचालकांचाही भरपूर दबाव असल्याचे बोलले जात आहे. मनाप्रमाणे काम करण्यास मोकळीकता नाही, असा सूर खासगीत निघतो आहे. कदाचित शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून त्याचा परिणाम दिसून येत आहे. माध्यमिकचे शिक्षण अधिकारी ओमप्रकाश गुढे यांच्यावर शिक्षण आयुक्तांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर सतीश मेंढे रुजू झाले. गुढे रुजू असतानाच मेंढे यांच्यासाठी शिक्षक आमदारांनी मंत्र्यांकडे शिफारस केली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र मेंढे जि.प.मध्ये फार काळ टिकू शकले नाही. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी लोखंडे यांची विभागाचा कारभार बघण्याची मानसिकताच नाही. विशेष म्हणजे लोखंडे हे सुरुवातीला नागपूर महापालिकेत शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. महापालिकेत त्यांचे कामही वाखाणण्याजोगे होते. मनपात त्यांनी पदाधिकाऱ्यांची मनमानी खपवून न घेतल्यामुळे त्यांच्याकडून शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार काढून घेतला होता. हा कित्ता त्यांना महापालिकेत गिरवता आला नाही. किंबहुना त्या वादात पडण्याची त्यांची मानसिकता नसल्याने त्यांनी विनंती बदलीची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. उपशिक्षणाधिकाऱ्यांच्याही बदल्या शालेय शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनोहर बारस्कर यांची प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. शालेय पोषण आहार नागपूर शहरचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांची अधीक्षक म्हणून सावनेर पंचायत समितीत बदली झाली. तर सावनेर पं.स. चे अधीक्षक जी.पी. गेडाम यांची वाघमारे यांच्या जागेवर बदली झाली. उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रा. ज्ञा. मुनघाटे यांची गटशिक्षणाधिकारी पं.स. आर्वी येथे बदली करण्यात आली आहे. मेंढे यांच्या जागी पटवे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी सतीश मेंढे यांची बदली शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहायक संचालक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याजागी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक एस.एन. पटवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसंचालक पारधींच्या बदलीचीही होती चर्चाशिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याही बदलीची जोरदार चर्चा होती. परंतु त्यांना कुठेही हलविण्यात आले नाही. त्यांची बदली न होण्यामागे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. सध्या त्यांची शिक्षक आमदारांशी चांगली गट्टी जमली असल्याची शिक्षण क्षेत्रात चांगली चर्चा आहे.
शिक्षण अधिकारी कुणाच्या दबावात?
By admin | Published: July 17, 2017 2:47 AM