राकेश घानोडे
नागपूर : प्रेयसीने प्रियकरावर लग्न करण्यासाठी दबाव आणणे म्हणजे, प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवून चार आरोपींविरुद्धचा वादग्रस्त एफआयआर रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. (The pressure to get married is not to commit suicide; High Court decision)
ही घटना अकोला जिल्ह्यातील वरखेड (ता. तेल्हारा) येथील आहे. मृताचे नाव अभिजित चितोडे होते. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. ती मुलगी व तिचे नातेवाईक अभिजितवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होते. लग्नास नकार दिल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकीही त्यांनी दिली होती. अभिजित बेरोजगार होता. परिणामी, या दबावामुळे तो मानसिक तणावात आला होता. त्यातून त्याने २ जानेवारी २०१९ रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या मोबाईलमध्ये संबंधित मुलीचे व्हॉटस् ॲप मॅसेज व ऑडिओ क्लिप आढळून आली. त्यावरून संबंधित मुलगी व इतर आरोपींनी अभिजितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होते, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. न्यायालयाने यासंदर्भातील कायदेशीर तरतुदी लक्षात घेता सरकारचा दावा फेटाळून लावला. आरोपींनी अभिजितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे ठोस पुरावे रेकॉर्डवर उपलब्ध नाहीत. प्रेयसीने लग्न करण्याचा आग्रह धरला म्हणजे, तिने प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले.
तक्रार एक महिना विलंबाने
अभिजितने आत्महत्या केल्यानंतर एक महिना विलंबाने म्हणजे, १ फेब्रुवारी २०१९ रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यावरून संबंधित मुलीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा वादग्रस्त एफआयआर दाखल करण्यात आला होता.