लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भंडारा जिल्ह्यातून रेतीची चोरी-तस्करी करणाऱ्यांना पकडून वाठोडा पोलिसांनी गुरुवारी त्यांच्या ताब्यातून रेती तसेच ट्रकसह २५ लाख, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातून लाखो रुपयांचा महसूल बुडवून रेती तस्कर रोज लाखोंची रेती नागपुरात आणतात. नागपुरात कळमना, नंदनवन आणि वाठोडा भागातून नंतर ही रेती शहरातील विविध भागात आणली जाते. अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असून, त्याची पोलिसांनाही कल्पना आहे. अनेक ठिकाणी रेती तस्करांनी आपले डेरे जमवले असून, तेथे ते बेवारस माल जमवून ठेवतात आणि नंतर त्याची विक्री करतात. वाठोड्यातील खरबी भागात रोशन ट्रेडर्सच्या मागे अशीच रेती जमवली जात असल्याची माहिती वाठोडा ठाण्यातील शिपायी हर्षल काटे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी गुरुवारी भल्या सकाळी तेथे जाऊन पाहणी केली असता, आरोपी अमोल भारत आकरे आणि अजय ईश्वर गबने हे भंडारा जिल्ह्यातील दोघे त्यांच्या दोन साथीदारांसह ट्रक क्रमांक एमएच ३६- एफ ३७३९ मधून रेती खाली करताना आढळले. पोलिसांनी त्यांना रॉयल्टी विचारली; मात्र त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्यांनी ही चोरी मध्यप्रदेशातून बोनकट्टा येथून चोरून आणल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. वाठोडा पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रेती आणि ट्रकसह २५ लाख, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली.
---
मोठे रॅकेट सक्रिय
रेती तस्करीत अनेक वर्षांपासून मोठे रॅकेट सक्रिय आहे. त्यांना काही स्वयंकथित नेते, दलाल अन् काही भ्रष्ट महसूल अधिकारी तसेच काही पोलिसांची साथ आहे. त्यामुळे शासनाला रोज लाखोंचा चुणा लावून ते महिन्याला कोट्यवधींची हेरफेर करतात.
----