- महेश एलकुंचवार : विद्या काणे यांच्या ‘मनातलं’ या लघुलेखसंग्रहाचे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुमच्या कलेला मिळणारे पुरस्कार, अन्य प्रतिष्ठेचा तुमच्या कलात्मक जीवनाशी कोणताही संबंध नसतो, असे मत ज्येष्ठ लेखक व नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघ व साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने विद्या काणे यांच्या ‘मनातलं’ या लघुलेखसंग्रहाचे प्रकाशन वि.सा. संघाच्या अमेय दालनात शनिवारी पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वि.सा. संघाचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे होते. यावेळी व्यासपीठावर साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुळकर्णी उपस्थित होते.
तुम्हाला येणारा अनुभव हा चांगला किंवा वाईट नसतो, तो निर्विकार असतो. तुम्ही तुमच्या भावनेनुसार चिकटवलेले संकेत, हे अनुभवाचा भाव असतो. लेखकाने अशा प्रत्येक अनुभवाची तयारी ठेवावी आणि लेखन हे व्रत समजून लिखाण करावे. लेखन प्रवासाची सुरुवात आनंदाने होते. मात्र, पुढच्या प्रवासात प्रत्येक गोष्ट पचवण्याची तादक तुमच्यात असावी लागते. शब्द हे बुद्धीने निर्मिलेले संकेत आहेत. त्यामुळे बुद्धी जिथे थांबते, तिथे शब्दही संपतात. त्यापलीकडे शब्द निरर्थक ठरतात आणि म्हणूनच अमूर्त संकल्पनांचे वर्णन करण्याची ताकद शब्दात नसल्याची भावना महेश एलकुंचवार यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले तर आभार डॉ. श्रीराम काणे यांनी मानले. यावेळी पाहुण्यांचे स्वागत वर्षा मनोहर यांनी केले. मुखपृष्ठ कलाकार महेंद्र पेंढारकर, मुद्रितशोधक भाग्यश्री बनहट्टी, वि.सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
....................