नागपूर : पोलीस असल्याची बतावणी करत दोन चोरट्यांनी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एका वृद्धेचे ४.९४ लाखांचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी चेनस्नॅचिंग झाली असल्याने दागिने काढून ठेवा असे सांगत हातचलाखी करत दागिने उडवले. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीॲंडटी कॉलनीत भर सायंकाळी ही घटना झाली.
निरुपमा नरेंद्र सिंग (७०, पीॲंडटी कॉलनी) या बुधवारी सायंकाळी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी घराजवळच पायी चालल्या होत्या. त्यांना एका व्यक्तीने थांबविले व पोलीस असल्याचे सांगितले. तुम्हाला साहेब बोलवत असल्याचे सांगत तो जवळच उभ्या असलेल्या तोतया पोलिसाकडे घेऊन गेला. काही वेळाअगोदर परिसरात चेनस्नॅचिंग झाली असून तुम्ही सोने घालू का फिरता असे म्हणून दागिने काढून बॅगेत ठेवायला सांगितले. त्यांनी त्यांचे दागिने स्वत:कडे घेत बॅगेत टाकल्याचे नाटक केले व त्यानंतर ते निघून गेले.
निरुपमा यांनी मैत्रिणीच्या घरी जाऊन बॅग तपासली असता त्यात सोन्याची चेन, बांगड्या दिसून आल्या नाही. आरोपींनी हातचलाखी करत ४.९४ लाखांचे दागिने लंपास केले. त्यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.