नागपूर : केंद्रीय पर्यटन विभागात महासंचालक असल्याची बतावणी करत एका तरुणाने नागपुरातील गुंतवणूकदारांची ४८.८५ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित आरोपीकडून केंद्रीय मंत्र्यांसोबतच उत्तर प्रदेशातील मंत्री, बॉलीवूड ॲक्टर्सची नावे असलेल्या बनावट पत्रिकांचा वापर करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सुनील वसंतराव कुहीकर (जयताळा) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (विश्वेश्वरगंज, वाराणसी), असे आरोपीचे नाव आहे. त्याने नागपुरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना संपर्क केला व तो केंद्रीय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर या पदावर अधिकारी असल्याची बतावणी केली. त्याने गुंतवणुकीच्या काही योजना असल्याची थाप मारली व गुंतवणूकदारांना काही बनावट पत्रिकांचे वाटप केले. त्यात केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशमधील मंत्री यांच्यासह बॉलीवूडमधील कलाकारांची नावेदेखील नमूद होती.
त्याच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांनी ४८.८५ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, त्याने कुठलाही आर्थिक परतावा दिला नाही. कुहीकर यांनी चौकशी केली असता तो तोतया अधिकारी असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यांनी राणाप्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी होशिंगविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला आहे.
शहरातील अनेकांची फसवणूक
होशिंगने शहरातील अनेक लोकांना आपल्या जाळ्यात अडकविले होते. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जर होशिंगने कुणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे लगेच संपर्क करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी केले आहे.